rajnikant and kamal hasan

जुन्या अभिनेत्यांच्या तुलनेत या दोन्ही नेत्यांनी सिनेमाचा उपयोग कधीच राजकीय संदेश देण्यासाठी केलाच नाही अशी टीका या नेत्याने केली आहे. हे अभिनेते जेथे होते तिथेच राहिले. त्यांच्या भोवती केवळ प्रसिद्धिचे वलय मात्र आहे. परंतु लोकांना आकर्षित करण्यास ते सक्षम नाहीत अशी टीप्पणीही करण्यात आली आहे.

नवराष्ट्र ब्युरो

दिल्ली. रजनीकांत (Rajnikant )आणि कमल हसन ( Kamal hasan) हे ‘राजकारणात एकाकी पडलेले खेळाडू’ आहेत अशी उपमा देत काँग्रेसचे ( congress )वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की हे दोघेही चित्रपट दुनियेतील प्रसिद्ध अभिनेते आहेत परंतु राजकीय विचारांद्वारे लोकांना प्रभावित करण्याचे कसब त्यांच्याकडे नाही. काँग्रेसद्वारे तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रमख समित्यांमध्ये समावेश असलेल्या अय्यर यांनी अभिनेता रजनीकांत निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याने कोणताही परिणाम होणार नाही असेही मत व्यक्त केले. काँग्रेस राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज असल्याचेही ते म्हणाले.कोणताही परिणाम होणार नाही

ज्यावेळी रजनीकांत यांनी राजकारणात येणार असल्याचे जाहीर केले होते त्यावेळी काहीच परिणाम होणार नाही असे मी म्हटले होते. आता तर त्यांनी राजकारणातच प्रवेश करणार नसल्याचे म्हटल्यानंतरही जे पूर्वी म्हटले होते त्यावर मी अजूनही कायम आहे असे अय्यर म्हणाले. कमल हसन आणि रजनीकांत हे एकाकी पडलेले राजकीय खेळाडू आहेत. जुन्या काळातील बाब वेगळी होती. तेव्हा चित्रपट दुनियेशी संबंधित एम.जी. रामचंद्रन (एमजीआर), शिवाजी गणेशन आणि जयललिता यांनीही समाजाला क्रांतिकारी संदेश दिला होता असे अय्यर म्हणाले.

राजकारणात अभिनेते अपयशीच ठरले

जुन्या अभिनेत्यांच्या तुलनेत या दोन्ही नेत्यांनी सिनेमाचा उपयोग कधीच राजकीय संदेश देण्यासाठी केलाच नाही अशी टीका अय्यर यांनी केली. ते जेथे होते तेथेच राहिले. त्यांच्या भोवती केवळ प्रसिद्धिचे वलय मात्र आहे. परंतु लोकांना आकर्षित करण्यास ते सक्षम नाहीत असे अय्यर म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचाही दाखला दिला. हे दोघेही अभिनेते राजकारणात अपयशीच ठरले असे ते म्हणाले. हीच बाब दक्षिणेकडील राज्यातही लागू होते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

——–

राजकारणात न येण्यावर रजनीकांत ठाम

अभिनेता रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नाही आणि चाहत्यांनी या मुद्यावर फेरविचार करण्यासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे आवाहन केले. उल्लेखनीय असे की रजनीकांत यांनी राजकारणात यावे यासाठी त्यांच्या चाहत्यांनी चेन्नईत शक्तीप्रदर्शन करीत निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान रजनीकांत यांनी आपला निर्णय आणि त्याचे कारण पूर्वीच स्पष्ट केले आहे असे म्हटले. रक्तदाबाच्या चढ-उतारांमुळे हैदराबादमध्ये रूग्णालयात दाखल झाल्यानंतर कोरोना विषाणूचा साथीचा व प्रकृतीची स्थिती पाहता आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे रजनीकांत यांनी जाहीर केले होते.