शाहनवाज हुसैन यांची बिहार विधानपरिषदेवर वर्णी लागणार !; भाजपाकडून नाव जाहीर

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. यामध्ये भाजपाने माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी आज (शनिवार) उमेदवारांची यादी जाहीर केली.

दिल्ली (Delhi).  भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. यामध्ये भाजपाने माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी आज (शनिवार) उमेदवारांची यादी जाहीर केली.

बिहारमध्ये दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या दोन्ही जागा भाजपाच्या कोट्यातीलच आहेत. ज्यामधील एक सुशील मोदी यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने, रिकामी झालेली आहे.तर, दुसरी जागा विनोद कुमार झा हे आमदार झाल्याने रिक्त झाली आहे. राज्यातील सद्यस्थितीस आमदारांची संख्या पाहता २८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला आपली एक जागा गमावावी लागण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा विरोधी पक्षास होणार आहे. बिहारमधील विधानपरिषदेच्या दोन जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. विनोद नारायण झा यांच्या रिक्त होणाऱ्या जागेचा कार्यकाळ २१ जुलै २०२२ असणार आहे. तर सुशील कुमार मोदी यांच्या जागेचा कार्यकाळ ६ मे २०२४ पर्यंत असणार आहे.

तर, उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या १२ जागांवर निवडणूक होत आहे. यापैकी भाजपाकडून सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. कुंवर मानवेंद्र सिंह, गोविंद नारायण शुक्ला, सलील बिश्नोई, अश्विनी त्यागी, धर्मवीर प्रजापती आणि सुरेंद्र चौधरी अशी उमेदवारांची नावं आहेत.

उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी २८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी आहे. या विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला ९ जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, अन्य पक्षांच्या वाट्याला एक जागा येऊ शकते, असे बोलल्या जात आहे. काँग्रेस आणि बसपाच्या वाट्याला एकही जागा येणार नसल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीअगोदर ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.