वाझेना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंगाचाच शरद पवारांचा खुलासा ; गृहमंत्र्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा

    नवी दिल्ली : ‘परमबीर सिंग यांनी पत्रात माझा उल्लेख केला आहे आणि आम्ही भेटलो देखील. तेव्हा त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांनीच घेतला होता. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतला नाही’ असा खुलासा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.

    बदली केल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहे. जे आरोप परमबीर सिंग यांनी लगावले आहेत त्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण अधिकार आहे. ही अत्यंत संवेदनशील आणि चुकांची मालिका असून यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. याची चौकशी झाली पाहिजे, असा सल्ला माझा आहे. ज्युलिओ रिबेरो अशा उत्तम अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हे सुचवणार आहे. माझ्या सूचना स्वीकारल्या जातील की नाही हे मला ठाऊक नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. सरकारवर या प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. या प्रकरणाचा शासन हा गांभीर्याने घेत आहे, असंही पवारांनी सांगितले.

    ‘राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात आले आहे हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या पत्राचे दोन भाग आहे. त्यांच्या पत्रामध्ये, प्रत्यक्ष पैसे जमा करण्याविषयी कोणतीही माहिती नाही. हे पैसे कुठून घेतले आणि ते कधी हस्तांतरित केले गेले, याविषयी पत्रात काहीही सांगण्यात आले नाही. त्या पत्रावर परमबीर यांची सही नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

    ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. आमच्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतली. यावर अजून चर्चा झाली नाही, चर्चा करू. तसंच या प्रकरणी मी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही, असंही पवारांनी स्पष्ट केले.