मराठा आरक्षणासह अकरा मुद्दयावर पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी शिवसेना खासदारांनी मागितली वेळ : खा. संजय राऊत

खासदारांच्या आजच्या बैठकीचा तपशील देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचे निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील प्रश्न आहेत काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत.

  नवी दिल्ली : शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेण्यासाठी पंतप्रधानांची वेळ मागितली आहे. खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

  मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी बैठक

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्याच्या महत्वाच्या ११ प्रश्नावर चर्चा केली होती. त्या संदर्भात पंतप्रधानांची आम्ही वेळ मागत आहोत. वेळ मिळताच पंतप्रधानांना भेटून मागण्या सादर करणार आहोत, असे राऊत म्हणाले.

  खासदारांच्या आजच्या बैठकीचा तपशील देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचे निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील प्रश्न आहेत काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत.

  रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. या ११ मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असे राऊत म्हणाले.

  मग अभ्यास किती दांडगा आहे पाहावे

  दरम्यान, शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते त्यावर खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावे, असे आव्हानच त्यांनी दानवेंना दिले.

  आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू

  खा. राऊत म्हणाले की, आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोक मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असे ते म्हणाले.