फुकट जेवण न दिल्याने गोळीबार – सपा नेत्याच्या गनरचा कारनामा

समाजवादी पक्षाचे माजी खासदार अक्षय यादव यांच्या गनरद्वारे दहशत पसरविण्याची घटना उघडकीस आली. ढाबा मालकाने फुकट जेवण न दिल्यामुळे त्याने गोळीबार केला.

दिल्ली: ग्रेटर नोएडा येथे समाजवादी पक्षाचे माजी खासदार अक्षय यादव यांच्या गनरद्वारे दहशत पसरविण्याची घटना उघडकीस आली. ढाबा मालकाने फुकट जेवण न दिल्यामुळे त्याने गोळीबार केला. दरम्यान तेथून पळ काढत मालकाने कसाबसा आपला जीव वाचवला.
सदर ढाबा कासना येथील कपील आणि अमित या दोन भावांचा आहे. शुक्रवारी रात्री अमीत ढाब्यावर असताना सपा नेता रामगोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादव याच्या सुरक्षेकरिता तैनात शिपाई सोनू भाटी आपल्या साथीदारांसह ढाब्यावर आला होता. यावेळी त्यांनी फुकट जेवण देण्याकरिता ढाबा चालकावर दबाव आणला होता. मात्र चालकाने नकार देताच त्याला ठार करण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान गनर सोनू भाटी याने गोळीबार केला. घटनेनंतर परिसरातील एका नागरिकाने गोळीबार झाल्याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी गनर सोनू भाटी, सत्येंद्र भाटी, शिवम सिंह, दुर्गेश याला अटक केली. यावेळी एक रिवॉल्वर आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहे..