आम्ही स्थानिक असल्यामुळे आणि आम्हीच विमानतळ बांधल्यामुळे आमचाच अधिकार; उद्घाटनावरुन राणे शिवसेना वाद पेटणार

तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या(Chipi Airport) उद्घाटनाच्या मुद्यावरुन राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेल्या राजकीय वादात नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी कोकणासाठी मोठी घोषणा करत महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार आहे, विमान वाहतूक सुरु करण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

    नवी दिल्ली :  तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या(Chipi Airport) उद्घाटनाच्या मुद्यावरुन राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेल्या राजकीय वादात नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी कोकणासाठी मोठी घोषणा करत महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार आहे, विमान वाहतूक सुरु करण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

    आम्हीच विमानतळ बांधल्यामुळे आमचा अधिकार

    नारायण राणे म्हणाले की, २०१४ मध्ये आपण स्वत: विमानतळ बांधून तयार केले. मी स्थानिक आहे, निलेश राणे आणि नितेश राणे स्थानिक आहेत. आम्ही स्थानिक असल्यामुळे आणि आम्हीच विमानतळ बांधल्यामुळे आमचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

    ५ सप्टेंबर रोजी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येत्या ७ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू होणार असल्याची माहिती देत मुख्यमंत्र्याना तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र पाठविल्याचे म्हटले होते.

    शिवसेना आणि खासदार कलेक्शन मास्टर

    विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल राणे यांना करण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांना बोलावलेच पाहिजे असेकाही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असे नाही, असे राणे म्हणाले. ते म्हणाले की, अतिवृष्टी आली, वादळ आले, पण कोकणासाठी काहीही मदत देण्यात आली नाही. शिवसेनेने कोकणात एकही प्रकल्प राबवला नाही. आज पाटबंधारे प्रकल्पाची कामे, रस्त्याची कामे,पुलांची कामे सर्व बंद आहेत. गेल्या अडीच वर्षात एकही विकासकाम सुरु नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. शिवसेना आणि खासदार कलेक्शन मास्टर असल्याचा आरोप यावेळी नारायण राणे यांनी केला.

    घरावर दगड मारणा-यांचा मुख्यमंत्री सत्कार करतात

    राणे यांनी यावेळी खास शैलीत मुख्यमंत्र्यावर टिका केली. ते बोलतात एक आणि वागतात वेगळे, अशी टीका यावेळी नारायण राणे यांनी केली. हिंदूंच्या सणांवेळी निर्बंध का? घरावर दगडफेक करताना पाचशे लोक एकत्र आली होती, त्यावेळी बंदी का नाही घातली असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. जे घरावर दगड मारतात त्यांचा मुख्यमंत्री सत्कार करतात, हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

    भीती दाखवून यांना घरातच बसायचे आहे

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची केवळ भीती दाखवली जात आहे, भीती दाखवून यांना घरातच बसायचे आहे. तिसरी लाट बाकीच्या राज्यात नाही का, फक्त महाराष्ट्रातच आहे का, इतके करुनही महाराष्ट्रात लाखो लोक कोरोनामुळे गेली. डॉक्टर नाही, वॅक्सिन नाही, आरोग्या सुविधा नाही, अशी अवस्था महाराष्ट्राची आहे.