शेतकरी आंदोलनात आतापर्यंत ‘इतक्या’ शेतकऱ्यांचा झाला मृत्यू

डिसेंबरच्या थंडीने जोर धरला असतानाही पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलनासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्ही हटणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

 

नवी दिल्ली: राजधानीतील कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कोरोना , कडाक्याची थंडी कशाची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा आठपर्यंत गेला आहे. नुकताच टिकरी सीमेजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृत शेतकऱ्याची प्रकृती सोमवारी अचानक खालावली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगढमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता.

यापूर्वी गज्जर सिंह नावाच्या शेतकऱ्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ब गज्जर सिंह लुधियानामधील समराला येथील खटरा भगवानपूर गावचा रहिवाशी होता. ते ५० वर्षांचे होते. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे आले होते. हादुरपगड बायपासजवळ न्यू बस स्टॅण्डजवळच त्यांचा मृत्यू झाला होता. याबरोबरच शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड होऊन आग लागल्याने या मेकॅनिकचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

जनकराज धनवाला मंडी येथील राहणारा असणारा हा तरुण आपले शेतकरी मित्र हरप्रीत, गुरप्रीत आणि गुरजंट सिंह यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बहादुरगड येथे आला होता. आंदोलनातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी तो आला होता. रात्री सर्वजण आपआपल्या जागी झोपण्यासाठी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अचानक गाडीने पेट घेतला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश दुग्गल यांनी दिली आहे.  शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्यापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टींची मदत सेवाभावी संस्थांकडून केली जात आहे.