रणनितीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याची शक्यता

प्रशांत किशोर यांचा पक्षात समावेश करण्याबाबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नवी दिल्ली: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. प्रशांत किशोर यांचा पक्षात समावेश करण्याबाबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनिया गांधी यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांशी या विषयावर चर्चा केली असून काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा पक्षात प्रवेश करण्यावर आक्षेप घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. कारण त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर ते पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहेत. तसेच भविष्यात काँग्रेस पक्षाची स्थिती अधिक बळकट होईल. परंतु किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरुन आणि निवडणूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका स्वीकारल्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.