शाळा सुरू करणे महत्त्वाचे; एनटीएजीआय प्रमुखांचा राज्य सरकारांना सल्ला

12 ते 17 वर्षे वयोगटातील गंभीर आजार असलेल्या मुलांची एक यादी तयार करून लसीचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. झायकोव्ह डी लस देण्यास सुरु करण्याआधी ही यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीच्या आधेर ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात होईल असेही अरोरा यांनी सांगितले.

    दिल्ली : जगातील पहिली डीएनए व्हॅक्सिन झायडस कॅडीलाला भारतात मंजुरी मिळाली आहे. ऑक्टोबरपासून लहान मुलांना लस देण्यात येईल. यामध्ये गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार करण्यात येईल. सर्वात आधी याच मुलांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती एनटीएजीआयचे प्रमुख एन के अरोरा यांनी दिली. यासोबतच मुलांचा बौद्धिक विकास महत्त्वाचा असून प्राथमिक शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारांना दिला.

    12 ते 17 वर्षे वयोगटातील गंभीर आजार असलेल्या मुलांची एक यादी तयार करून लसीचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. झायकोव्ह डी लस देण्यास सुरु करण्याआधी ही यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीच्या आधेर ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात होईल असेही अरोरा यांनी सांगितले.

    प्रारंभी झायडस कॅडिला कंपनीकडून मर्यादित प्रमाणात लस मिळू शकते. त्यामुळे ही लस लहान मुलांसाठी राखून ठेवली जाईल. लशीचा पुरवठा नियमित आणि पुरेशा प्रमाणात झाल्यानंतर ती वयस्कर लोकांसाठी देखील उपलब्ध केली जाऊ शकते.

    झायकोव्ह डी लसीला मंजुरी मिळाल्यानंतर देशात आता कोरोनाविरोधात लढ्यात 6 लशी झाल्या आहेत. झायडस कॅडीलाचे तीन डोस देण्यात येणार आहेत. कंपनीने म्हटलं की, झायडस कॅडीला लसीचे 100 मिलियन ते 120 मिलियन डोस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसंच लसीचा साठा कऱण्यास सुरुवात केली आहे. कॅडीला हेल्थकेअर लिमिटेडने 1 जुलै रोजी लसीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. या लसीची ट्रायल 28 हजारांहून अधिक लोकांवर करण्यात आली. ही लस 66.6 टक्के इतकी प्रभावी ठरली आहे.