चांद्रमोहिमेचे चित्र
चांद्रमोहिमेचे चित्र

मंगळावर किंवा अंतरिक्षातील कोणत्याही दूरच्या ग्रहावर जाण्यासाठी पृथ्वीवरून निघाल्यापासून अंतरिक्षात एक मुक्‍काम ठोकण्याचे ठिकाण किंवा अशा मोहिमांचे संचालन करण्याचे ठिकाण म्हणून चंद्रालाच आजही महत्त्व दिले जात आहे. भलेही चंद्रावर मानवी वसाहती उभारण्यात यश आले नाही, तर तिथे अशी उपकरणे बसविली जातील जी अंतरिक्षातील दूरवरच्या ग्रहांवर जाण्याच्या मार्गावर असलेल्या यानांचे नियंत्रण करतील. नासा या अमेरिकेच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेने आखलेली अपोलो मोहीम संपल्यानंतर माणूस पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याचा प्रयत्न सुरू करेल, असे त्यावेळी कुणाला वाटले नव्हते. परंतु, चंद्रावर माणसाचे पाऊल पहिल्यांदा उमटल्याच्या घटनेला पन्नास वर्षे लोटल्यानंतर आता याबाबतीत जगभरात हालचाली पुन्हा एकदा गतिमान झाल्या आहेत.

दिल्ली (Delhi).  मंगळावर किंवा अंतरिक्षातील कोणत्याही दूरच्या ग्रहावर जाण्यासाठी पृथ्वीवरून निघाल्यापासून अंतरिक्षात एक मुक्‍काम ठोकण्याचे ठिकाण किंवा अशा मोहिमांचे संचालन करण्याचे ठिकाण म्हणून चंद्रालाच आजही महत्त्व दिले जात आहे. भलेही चंद्रावर मानवी वसाहती उभारण्यात यश आले नाही, तर तिथे अशी उपकरणे बसविली जातील जी अंतरिक्षातील दूरवरच्या ग्रहांवर जाण्याच्या मार्गावर असलेल्या यानांचे नियंत्रण करतील. नासा या अमेरिकेच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेने आखलेली अपोलो मोहीम संपल्यानंतर माणूस पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याचा प्रयत्न सुरू करेल, असे त्यावेळी कुणाला वाटले नव्हते. परंतु, चंद्रावर माणसाचे पाऊल पहिल्यांदा उमटल्याच्या घटनेला पन्नास वर्षे लोटल्यानंतर आता याबाबतीत जगभरात हालचाली पुन्हा एकदा गतिमान झाल्या आहेत.

चंद्राची उलगडणार रहस्ये
सर्वांत ताजा प्रयत्न चीनकडून करण्यात आला आहे. चांग ई-5 ही चीनची चांद्रमोहीम 24 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू झाली. त्या दिवशी प्रक्षेपित केलेले हे यान डिसेंबरमध्ये चंद्रावर पोहोचले आहे. दोन दिवसांतच त्या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात केली. चंद्रावरील माती आणि दगडांचे नमुने जमा करून पृथ्वीवर आणण्यासाठी चीनकडून हे यान पाठविण्यात आले आहे. त्यामुळेच या मोहिमेद्वारे चंद्राबाबतची आणखी काही रहस्ये उकलण्याची चिन्हे आहेत. परंतु असा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये चीन एकमेव देश नाही. भारत आणि चीनव्यतिरिक्‍त खुद्द नासानेही चंद्रावर यान पाठविण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा नुकताच केला आहे. 2024 मध्ये नासा चंद्रावर पहिल्या महिलेला पाठविणार असून, एका पुरुष अंतराळवीरालाही चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला पुन्हा पाठविणे हे आजही मोठे आव्हान आहे हे खरेच आहे.

शास्त्रज्ञांमध्ये नवा उत्साह
सरकारी आणि खासगी संस्थांच्या प्रयत्नांमधून अंतरिक्षात यान घेऊन जाणे आणि ते सुरक्षित परत आणणे हे काम करणारी रॉकेट आज विकसित झाली आहेत. परंतु तरीही पृथ्वीवरून एकदा उड्डाण करून अंतरिक्षात पोहोचलेले यान एखाद्या ग्रहावर, उपग्रहावर चपखलपणे उतरविणे आणि पुन्हा त्याच कौशल्याचे दर्शन घडवून यान परत पृथ्वीवर आणणे ही प्रक्रिया आजही प्रचंड जटिल आणि जोखमीची आहे. परंतु या बाबतीत भारत आणि चीनने आयोजित केलेल्या अनेक मोहिमांनी शास्त्रज्ञांमध्ये नवा उत्साह भरला आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञ आपल्या सर्वांत जवळच्या शेजाऱ्याकडे म्हणजेच पृथ्वीपासून अवघ्या 3 लाख 74 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्राकडे पुन्हा एकदा नव्या नजरेने पाहू लागले आहेत.

भारताचे महत्त्वपूर्ण योगदान
चंद्रावर जाण्यासाठी सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या शर्यतीचे बरेचसे श्रेय भारताला दिले जाऊ शकते. इस्रो या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने 22 ऑक्‍टोबर 2008 रोजी जेव्हा आपले चांद्रयान-1 रवाना केले, तेव्हा भारताने अंतरिक्ष संशोधनात आणखी एक दमदार पाऊल उचलले आहे, हे दाखवून देण्यापलीकडे या मोहिमेकडून फारशी आशा कुणाला नव्हती. परंतु सातत्यपूर्ण संशोधन केल्यानंतर जेव्हा चांद्रयान-1 ने चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे दिले, तेव्हा जग थक्‍क झाले. चांद्रयान-1 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचविण्यात आलेल्या ‘मून इम्पॅक्‍ट प्रोब’ या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर डोंगर आणि धूलिकणांमध्ये वाफेच्या स्वरूपात पाणी पाहिले होते. चंद्रावरील हे डोंगर दहा लाख वर्षांपेक्षाही अधिक जुने मानले जातात. याच प्रकारचे अन्य एक उपकरण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चांद्रयान-2 यानातून पाठविण्यात आले.

‘प्रज्ञान’ नावाचे हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाकडे पाठविण्यात आले होते. या रोव्हरचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर तेथील पृष्ठभागावर पाणी आणि खनिजांचा शोध घेणे हा होता. अर्थात चांद्रयान-2 मोहीम अपयशी ठरली. या अपयशामुळे भारताचे इरादे मात्र कमकुवत झाले नाहीत. 2022 मध्ये ‘गगनयान’ या मोहिमेच्या माध्यमातून नासाप्रमाणेच अंतराळवीरांना अंतरिक्षात पाठविणार असल्याची घोषणा इस्रोने केली आहे. अन्य अनेक देशही चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी इस्राएलनेही आपले एक छोटेसे रोबोटिक लॅंडर चंद्रावर उतरण्यासाठी पाठविले होते. परंतु ते सुरक्षितपणे चंद्रावर उतरू शकले नव्हते. सध्या या बाबतीत यश केवळ चीनला मिळाले आहे. चीनच्या ई-4 या यानाने गेल्या वर्षी जानेवारीत एक रोबोटिक रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला आहे.

चंद्रावर मानवाला पाठविण्याची व्यापक योजना
सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, चीनचे हे यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूला म्हणजेच पलीकडील बाजूला उतरविण्यात आले होते. या भागात कोणत्याही अन्य देशाचे यान तोपर्यंत उतरू शकले नव्हते. भारत, चीन, इस्रायल आणि जपान या देशांच्या चंद्रावर जाण्याच्या तयारीमुळे प्रेरित होऊन नासाने ‘आर्टेमिस मून’ नावाची मोहीम आखून चंद्रावर मानवाला पाठविण्याची व्यापक योजना जाहीर केली आहे. या मोहिमेसाठी नासाने आठ देशांबरोबर महत्त्वाचा करारसुद्धा केला आहे. या करारांतर्गत सर्व आठ देश शांततापूर्ण मार्गाने आणि जबाबदारीने चंद्राच्या संशोधनात एकमेकांना सहकार्य करणार आहेत. योजनेनुसार, ‘आर्टेमिस मिशन’सुद्धा अपोलो-11 प्रमाणेच एक आठवडा अवधीचे असेल. परंतु शास्त्रीय उपक्रमांच्या दृष्टीने विचार केल्यास ही मोहीम अपोलो-11 पेक्षा कितीतरी मोठी असणार आहे.