बुलेट ट्रेनच्या २३७ किमी लांबीच्या मार्गासाठी तांत्रिक निविदा खुली

नवी दिल्ली  : मुंबई-अहमदाबाद या भारतातील पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्वात मोठी तांत्रिक निविदा प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी आज, २३ सप्टेंबर रोजी, खुली केली. या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत तीन निविदाकर्त्यांनी सहभाग घेतला ज्यात सात मोठ्या बांधकाम कंपन्यांचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गादरम्यान १२ स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. एकूण मार्गापैकी २३७ लांबीचा मार्ग आणि ४ स्थानके यांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने आज निविदा खुल्या केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी निविदा आहे. या निविदा प्रक्रियेत ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड- इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड- जेएमसी प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे, एल अँड टी लिमिटेड यांनी स्वतंत्रपणे तर एनसीसी लिमिटेड- टाटा प्रोजेक्ट लिमिटेड- जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे अशा सात मोठ्या बांधकाम कंपन्यांचा समावेश असलेल्या तीन निविदाकर्त्यांनी सहभाग नोंदवला. वापी ते बडोदा या दरम्यानच्या २३७ किमी लांबीच्या मार्गात वापी, बिलिमोरा, सुरत आणि भरूच या चार स्थानकांच्या बांधकामासह नदीवरील २४ पूल तर रस्त्यांवरील ३० पुलांचा समावेश आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमध्ये आतापर्यंत ८३ टक्के भूसंपादन झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा ९० हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे केवळ रोजगारांचीच निर्मिती होणार आहे असे नव्हे तर उत्पादन क्षेत्रालाही मोठे बळ मिळणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत ७५ लाख मेट्रिक टन सिमेंट, २१ लाख मेट्रिक टन पोलाद आणि १.४ लाख मेट्रिक टन बांधकामाचे पोलाद इत्यादी साहित्याचा वापर होणार आहे. हे सर्व उत्पादन भारतात होणार आहे. याशिवाय बांधकामासाठी मोठ्या यंत्रांचीही गरज भासणार आहे.