दहा महिन्यात दहा हजार कंपन्या झाल्या बंद; केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राचेही नाव

केंद्र सरकारने कंपन्यांबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरित परिणाम झाला असेल, हे स्पष्ट होत आहे. कोरोना काळातील 10 महिन्यात भारतातील 10,113 कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्राने दिली आहे. बंद करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातील 1 हजार 279 कंपन्यांचा समावेश आहे.

  दिल्ली : कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचे अर्थचक्र पूर्णत: कोलमडले आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांसह अनेक विकसनशील देशांना कोरोनाने आर्थिक गर्तेत ढकलले आहे. जगभरासह भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास धडपडत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा जबरदस्त फटका उद्योगांना बसला आहे. दहा महिन्यात दहा हजार कंपन्यां बंद झाल्या आहेत. केंद्र सरकारने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.

  केंद्र सरकारने कंपन्यांबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरित परिणाम झाला असेल, हे स्पष्ट होत आहे. कोरोना काळातील 10 महिन्यात भारतातील 10,113 कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्राने दिली आहे. बंद करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातील 1 हजार 279 कंपन्यांचा समावेश आहे.

  केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत याबाबतची आकडेवारी सादर केली. केंद्र सरकारने या कंपन्या कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने बंद करण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे.

  एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठे कारण हे देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 248 (2) अंतर्गत एकूण 10 हजार 113 कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. कलम 248 (2) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करून त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  राज्य आणि बंद झालेल्या कंपन्यांची आकडेवारी

  • दिल्ली 2 हजार 394
  • उत्तर प्रदेश 1 हजार 936
  • तामिळनाडू 1 हजार 322
  • महाराष्ट्र 1 हजार 279
  • कर्नाटक 836
  • चंदीगड 501
  • राजस्थान 479
  • तेलंगणा 404
  • केरळ 307
  • झारखंड 137
  • मध्य प्रदेश 111
  • बिहार 104
  • मेघालय 88
  • ओडीशा 78
  • छत्तीसगड 47
  • गोवा 36
  • पुदूच्चेरी 31
  • गुजरात 17
  • पश्चिम बंगाल 04
  • अंदमान निकोबार 02