श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चनापोरा येथील CRPF BN 29 वर ग्रेनेड फेकला.

    नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खानयार परिसरात दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलल्या गोळीबारात पोलीस अधिकारी अरशद यांना गोळ्या लागल्या आहेत. यानंतर जखमी झालेल्या अरशद यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ते शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

    दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पोलिसांवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून चनापोरा भागात तैनात असलेल्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चनापोरा येथील CRPF BN 29 वर ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला. तसेच एक महिला देखील जखमी झाली होती.