सीरम इंस्टिट्यूटला केंद्र सरकारकडून लसीची पहिली ऑर्डर ; ‘इतकी’ आहे लसीची किंमत

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये कोरोना योद्धा असलेल्या अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होता आहे. पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. लशीच्या एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असणार असल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.

सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये कोरोना योद्धा असलेल्या अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.

लशीच्या वाहतुकीसाठी सज्ज
सीरम इंस्टिट्यूटकडून लशीच्या वाहतुकीसाठीची देखील तयारी पूर्ण झाली आहे. कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेट कंपनी देशाच्या कानाकोपऱ्या लशीची वाहतूक करणार आहे. सीरम इंस्टिट्यूटबाहेर कोल्ड स्टोरेज वाहनं देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.