एकेकाळचा टॉपर ‘या ‘कारणामुळे बनला कुख्यात गुंड; पोलिसांनी केला एन्काउंटर

कुलदीप सिंह याने दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित अशा किरोडीमल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. त्याने या कॉलेजमध्ये वनस्पती विभागात ऑनर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, २०१३ साली गावात एक छोटासा वाद झाला. या वादातून त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं.

     दिल्ली: दिल्ली पोलिसांनी कुख्यात गुंड कुलदीप सिंह ऊर्फ फज्जा याला नुकतंच एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. फज्जा याच्याविरोधात तब्बल ५० पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. गुन्हासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं, मात्र तो पोलीस कस्टडीमधून पळून गेला होता. विशेष म्हणजे हा कुलदीप सिंह कोणी साधा गुन्हेगार नव्हता तर एकेकाळी दिल्ली विद्यापीठातील टॉपर विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा.

    कुलदीप सिंह याने दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित अशा किरोडीमल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. त्याने या कॉलेजमध्ये वनस्पती विभागात ऑनर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, २०१३ साली गावात एक छोटासा वाद झाला. या वादातून त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर तो या विश्वात भरडला गेला. या घटनेनंतर त्याने हातात बंदूक धरली. त्याने प्रचंड गुन्हे केले. त्याच्याविरोधात लूटमारसह अनेकांत्या हत्येचे गुन्हे आहेत.

    फज्जा होता पोलिसांच्या रडारवर

    कुलदीप सिंह हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर होता. गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलीस त्याला २५ मार्चला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात त्याच्या मेडिकल टेस्टसाठी घेऊन गेले. त्यावेळी रुग्णालयाबाहेर फज्जाच्या सहकाऱ्यांनी गोळीबार करत त्याला पळवून नेलं. फज्जा पळाल्यामुळे दिल्ली पोलिसांची नाहक बदनामी झाली. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक त्याचा शोध घेत होतं. त्याचं कुटुंब नरेलाच्या नया बांस भागात राहतं. पोलिसांनी सगळ्या संशयित ठिकाणी त्याचा शोध घेतला.

     रोहिणी परिसरात केला एन्काउंटर

    दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतील रोहिणी परिसरात एका अपार्टमेंटमध्ये फज्जा आणि त्याच्या सहकाऱ्यांना स्पॉट केलं होतं. त्यानंतर पोलीस रात्री उशिरा त्या परिसरात दाखल झाले. पोलीस परिसरात येताच फज्जाने समोरुन गोळीबार सुरु केला. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलं. या गोळीबारात काही पोलिसांच्या बुलेट प्रुफ जॅकेटला गोळी लागली होती, असंही पोलिसांनी सांगितलं