The submarine sank near the island of Bali; 53 soldiers drowned due to lack of oxygen

  दिल्ली : इंडोनेशियाची बेपत्ता पाणबुडी ‘केआरआय नंग्गाला 402’ सरावादरम्यान भरसमुद्रात बुडाली आहे. यामुळे पाणुबडीवरील चालक दलासह 53 सैनिकांना जलसमाधी मिळाली आहे. इंडोनेशियाच्या नौदलाने यास दुजोरा दिला आहे. लष्करप्रमुख हादी जाहजंतो यांनी इंडोनेशियाची ‘केआरआय नंग्गाला 402’ पाणबुडी बाली बेटांजवळ बुडाल्याचे सांगितले. तसेच नौदलाचे चीफ ऑफ स्टाफ अॅडमिरल युदो मारगोनो यांनीही सांगितले की, पाणबुडी भरसमुद्रात बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणबुडीचा विस्फोट झाला असता तर त्याचे तुकडे समुद्रावर आढळून आले असते. तसेच सोनारमध्ये याचा आवाज ऐकू आला असता.

  बालीजवळ अखेरचे दर्शन

  ‘केआरआय नंग्गाला 402’ ही पाणबुडी इंडोनेशियाने जर्मनीकडून खरेदी केली होती. या पाणबुडीचे अखेरचे दर्शन बालीजवळ बुधवारी झाले होते. यानंतर पाणबुडीशी संपर्क तुटला होता. यानंतर नौदलाने पाणबुडी 600 ते 700 मीटर खोल बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच याचे पुरावेदेखील आढळून आल्याने मारगोनो यांनी पाणबुडी बुडाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. तसेच आतापर्यंत एकही मृतदेह सापडला नसल्याचेही ते म्हणाले.

  3 दिवसांचा ऑक्सिजन होता बाकी

  दरम्यान, गायब पाणबुडीच्या शोधमोहीमेत जहाजांसह विमान आणि शेकडो नौसैनिक सहभागी झाले होते. मात्र, पाणबुडीमध्ये फक्त 3 दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन बाकी होता. शनिवारी हा ऑक्सिजन संपला. त्यानंतरही पाणबुडीचा शोध न लागल्याने ती बुडल्याचे ग्राह्य धरण्यात आले.

  सरावादरम्यान झाली होती गायब

  ‘केआरआय नंग्गाला 402’ ही पाणबुडी एका सरावामध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान समुद्रामध्ये दबाव न झेलू शकल्याने पाणबुडीसोबत अपघात होऊन ती बुडाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाणबुडी बुडाली त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग पसरला होता.