लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे

ज्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे, मात्र या संसर्गाची कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत, अशा मुलांसाठी कुठल्याही प्रकारच्या उपचारांचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र मुलांमध्ये दिसणाऱ्या संभाव्य लक्षणांवर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला पालकांना देण्यात आला आहे.

  नवी दिल्ली: देशात सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग होताना दिसत आहे. संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून पालकांनी आपल्या मुलांचा कोरोना संसर्गापासून बचाव केला पाहिजे. लहान मुलांना कोरोनाचा चटकन संसर्ग होतो, त्यामुळे आपली मुले गर्दीच्या ठिकाणी जाणार नाहीत. त्यांचा इतरांशी संपर्क येणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.

  आरोग्य मंत्रालयाची ‘ही’ आहेत मार्गदर्शक तत्त्वे
  ज्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे, मात्र या संसर्गाची कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत, अशा मुलांसाठी कुठल्याही प्रकारच्या उपचारांचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र मुलांमध्ये दिसणाऱ्या संभाव्य लक्षणांवर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला पालकांना देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वांची दोन कागदपत्रे जारी केली आहेत. यात एका कागदपत्रामध्ये मुलांच्या ‘होम आयसोलेशन’ संबंधी रिव्हाईज्ड गाईडलाईन्सचा समावेश आहे, तर दुसऱ्या कागदपत्रामध्ये मुलांच्या उपचारासंबंधी मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा अंतर्भाव केला आहे.

  सौम्य संसर्गासाठी मार्गदर्शक तत्त्वे
  गळ्यात खवखव, अधूनमधून खोकला यांसारखी सौम्य लक्षणे असतील, पण श्वासाच्या त्रासासारखी गंभीर लक्षणे नसतील, त्यावेळी मुलांना होम आयसोलेशनमध्येच ठेवा.

  मुलांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही, याची विशेष काळजी घ्या. मुलांना लिक्विड पदार्थ द्या.

  जर मुलांना ताप येत असेल तर १० ते १५ मिलीग्राम पॅरासिटामोल द्या.

  जर काही धोकादायक लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

  मध्यम स्वरुपाची कोरोना लक्षणे
  ज्या मुलांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी आहे, मात्र न्युमोनियाची लक्षणे नाहीत, अशा मुलांचा या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

  मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड हेल्थ सेन्टरमध्ये दाखल केले जाऊ शकते.

  मुलांना ताप येत असेल तर पॅरासिटामोल आणि बॅक्टिरियल इन्फेक्शन असेल तर एमोक्सिसिलिन देऊ शकता.

  जर मुलांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मुलांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करायला हवा.

  गंभीर लक्षणे असलेल्या मुलांची घ्यावयाची काळजी
  मुलांमध्ये गंभीर निमोनिआ (न्यूमोनिया), रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस), मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम (एमओडीएस) आणि सेप्टिक शॉक यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर ती गंभीर लक्षणे असतात.

  या कॅटेगरीतील मुलांना तातडीने आयसीयू किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. या मुलांचे ब्लड काऊंट, लिव्हर, रिनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाला देण्यात आला आहे.