‘हे पदक शेतकरी आंदोलनातील हुतात्मा शेतकऱ्यांना समर्पित’ ; पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा- महिला बॉक्सर स्वीटी बूराचे आवाहन

दुबईमध्ये २१ मे पासून सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे. मी हे पदक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करते. त्याचबरोबर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की, गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्यावर विचार करावा -स्वीटी बूरा

    दिल्ली: दुबई येथे चालू असलेल्या आशियाई चॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणाच्या स्वीटी बूरा हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. तिनं आपलया यशाची माहिती ट्विट करून दिली आहे. आपल्याला मिळालेले हे पदक त्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित केले आहे. याचवेळी कोरोना माहामारीच्या काळातही गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीचा तप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करावा असं आवाहन तिनं केले आहे.

    स्वीटीने याबाबत एक ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं आहे. “दुबईमध्ये २१ मे पासून सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे. मी हे पदक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करते. त्याचबरोबर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की, गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्यावर विचार करावा”, असं स्वीटीनं म्हटलं आहे.

    स्वीटी बूरा ही भारताच्या प्रमुख महिला बॉक्सर खेळाडूमधील एक आहे. हरियाणातील हिसार हे तिचे गाव आहे. स्वीटीने २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. तिचे वडिल महेंद्रसिंह हे शेतकरी आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रीय बास्केटबॉल देखील खेळले आहेत.