दहशतवाद्यांनी टेलिग्राम Appच्या माध्यमातून या स्फोटकांची जबाबदारी घेणारा मेसेज पाठविला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे. प्रकरणाचा सुरू असलेला तपास तिहार जेलपर्यंत पोहोचला असून टेलिग्राम Appच्या माध्यमातून या स्फोटकांची जबाबदारी घेणारा एक मेसेज पाठविण्यात आला होता. तिहार कारागृहात इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  दिल्ली (Delhi).  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे. प्रकरणाचा सुरू असलेला तपास तिहार जेलपर्यंत पोहोचला असून टेलिग्राम Appच्या माध्यमातून या स्फोटकांची जबाबदारी घेणारा एक मेसेज पाठविण्यात आला होता. तिहार कारागृहात इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  मोबाईल लागला हाती
  दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तहसीन अख्तरला ठेवण्यात आलेल्या कारागृहात धाड टाकल्यानंतर टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात मोबाईल हाती लागला. 2014 मध्ये पाटणामध्ये नरेंद्र मोदींच्या रॅलीला टार्गेट करत करण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तहसीन अख्तरला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद आणि बोधगया येथील साखळी स्फोटांमध्येही त्याचे नाव आहे.

  टेलिग्राम अकाउंट
  टेलिग्रामवर अकाउंट तयार करण्यासाठी टोर ब्राऊझरचा वापर करत व्हच्युअल नंबरची मदत घेण्यात आली होती. यानंतर या अकाउंटचा वापर करत अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांची जबाबदारी घेण्यात आली होती. पोलिस तहसीन अख्तरची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्याचा विचार करत आहेत.

  वाझे यांची दोनदा बदली
  मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) विभागात गुरुवारी रात्री बदली करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-1 म्हणजेच विशेष शाखेत कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे.

  मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यातच काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. यानंतर वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने वाझेंवर खुनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

  घटनास्थळी रीक्रिएट केला सीन
  अँटीलिया प्रकरणात सापडलेल्या स्पॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ठाण्यातील खाडी परिसरात डमी बॉडीने घटना रीक्रिएट केली. एटीएसला संशय आहे की, मनसुख यांचा खून करून मृतदेह या ठिकाणावरून फेकून देण्यात आला आहे. सीन रीक्रिएट करतेवेळी खाडीमध्ये लो टाइड होती. सीन रीक्रिएशननंतर एटीएसच्या टीमने हवामान तज्ज्ञ आणि स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली. यानंतर काही मच्छीमारांचे जबाबदेखील नोंदवण्यात आले.

  मनसुखची नव्हती गाडी
  25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर ज्या स्कॉर्पियोमध्ये स्फोटके मिळाली होती ती मनसुख हिरेन यांची नसल्याचे तपासात समोर आले आहे. या स्कॉर्पियोच्या मालाकाचे नाव सॅम पीटर न्यूटन असून या गाडीचे रजिस्ट्रेशन 7 एप्रिल 2007 ला ठाणे आरटीओमध्ये करण्यात आले होते. सॅम पीटर न्यूटन हे ठाण्याचे निवासी आहे.