राज्य सरकार पूरस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका

कोकणात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यासाठी केंद्रीय पातळीवर नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सुमारे ३५० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे.

    नवी दिल्ली : केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी कोकणात आलेल्या पुरस्थितीबाबत केंद्रीय मंत्र्याशी चर्चा केली आणि आवश्यक मदत आणि बचावकार्यासाठी चर्चा केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचवेळी राणे यांनी राज्य सरकार पूरस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टिका केली आहे. राज्याला ड्रायव्हर नको तर लोकहित पाहणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख न करता हाणला आहे.

    गरज भासल्यास गृहमंत्री अमित शाहशी चर्चा

    कोकणात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यासाठी केंद्रीय पातळीवर नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सुमारे ३५० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. हेलिकॉप्टर, बोटीने लोकांना काढण्यासाठी तसेच, अन्न पुरवठा करण्यासाठी रॉय यांच्याशी बोललो आहे. त्यांनी आश्वासन दिले की मी सगळी व्यवस्था करतो. गरज भासल्यास आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राणे म्हणाले. दरम्यान राणे यानी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतल्याचे सांगितले.

    राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य आहे का?

    यावेळी राज्य सरकारवर टिका करताना राणे म्हणाले की, अचानक पाऊस पडल्याचे राज्य सरकारच्या अधिका-यांचे म्हणणे योग्य नाही ३५०  मिमी पाऊस ४८ तासातील आहे. राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नाही. कोकणात लोकांचा जीव धोक्यात असताना साध्या बोटींची तरतूदही करता येत नाही का? असा सवाल राणेंनी केला.  ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य आहे का? असा प्रश्न पडतो.

    पंढरपूरला जायचे यात काय भूषण

    राणे म्हणाले की, मंत्रालयात जायचे नाही, कॅबिनेटला जायचे नाही आणि गाडी चालवत पंढरपूरला जायचे यात काय भूषण आहे, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्याना गाडी चालवत पंढरपूरला जाताना दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे. असे अनेक ड्रायव्हर आहेत. राज्याला चांगला, लोकांचे हित पाहणारा मुख्यमंत्री हवा आहे अशी टिका त्यांनी केली.