केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाचा नवा विक्रम, लॉकडाऊनमध्येही सुरु होते ‘हे’ काम

नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने महामार्ग बांधकाम पूर्ण करण्याचा तीन वर्षाचा विक्रम मोडला आहे. त्यांच्या मंत्रालयाने अपेक्षेपेक्षा दुप्पट रस्ते कोरोना काळात निर्माण केले आहेत.

दिल्ली : देशात कोरोनाने शिरकाव केल्यावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण देश ठप्प झाला होता. देश ठप्प असूनही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मात्र युद्धपातळीवर रस्ते तयार करण्यात व्यस्त होते. त्यामुळे आतापर्यंतच्या रस्ते निर्मितीचा विक्रम मंत्रालयाने मोडीत काढला आहे.

नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने महामार्ग बांधकाम पूर्ण करण्याचा तीन वर्षाचा विक्रम मोडला आहे. त्यांच्या मंत्रालयाने अपेक्षेपेक्षा दुप्पट रस्ते कोरोना काळात निर्माण केले आहेत. लॉकडाऊन दरम्यान म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एकूण २७७१ किमीचा महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ठेवले होते. कोरोनमुळे प्रतिकूल परिस्थिती उद्भवलेली असूनही ठराविक लक्ष्यापेक्षा चारशे किलोमीटरपेक्षा जास्त ३१८१ किमी महामार्गाचं काम पूर्ण करण्यात आले.


सार्वजनिक बांधकाम विभागाने २१०४ किमी, एनएचएआय ८७९ किमी आणि एनएचआयडीसीएलने १९८ किलोमीटरचा महामार्गाचे बांधकाम पूर्ण केला आहे. मागील विक्रम ऑगस्ट २०१९ पर्यंत होता. यामध्ये १३६७ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. तर आता ऑगस्ट २०२० मध्ये दुप्पट पटीने बांधकाम पूर्ण झाले आहे. कोरोना काळात महामार्गाच्या निर्मितीसाठी ३१ हजार कोटींचा खर्च करण्यात आला असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.