आजपासून दिल्लीदेखील ट्रॅकवर, मेट्रो सुरु, दुकानं आणि कार्यालयंही सुरु, अशी आहे नियमावली

दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटीव्हिटी दर खाली येत असून ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं दिल्ली सरकारकडून सांगण्यात आलंय. दिल्लीतील रात्रीची संचारबंदी मात्र आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली असून दिवसाच्या वेळेत अनेक व्यवसायांना दुकान सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय.

    देशाची राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून दुकाने, बाजारपेठा, हॉटेल्स आणि मॉल्स यांच्यासह दिल्लीची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी दिल्ली मेट्रोदेखील सुरु झालीय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळालाय.

    दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटीव्हिटी दर खाली येत असून ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं दिल्ली सरकारकडून सांगण्यात आलंय. दिल्लीतील रात्रीची संचारबंदी मात्र आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली असून दिवसाच्या वेळेत अनेक व्यवसायांना दुकान सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय.

    दिल्ली मेट्रो निम्म्या क्षमतेनं सुरू झालीय. नागरिकांना मेट्रोमध्ये आणि मेट्रो स्टेशन्सवर गर्दी करू नये आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असं आवाहन दिल्ली सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. तर गेल्या दीड महिन्यांपासून बंद असणारे मॉल्स, बाजारपेठा आणि कार्यालयं यांना त्यांचे व्यवहार पहाटे ५ वाजल्यापासून सुरू करण्याची मुभा देण्यात आलीय.

    दिल्लीत सध्या ५८८९ ऍक्टिव्ह कोरोना केसेस आहेत. त्यामुळे हा अंशतः दिलासा देण्याचा प्रयत्न असून लवकरच पूर्ण अनलॉकच्या दिशेने निर्णय घेण्यात येतील, असं दिल्ली प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय. देशात कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वात सुरुवातीला आली होती. या दोन राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. आता महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील रुग्णसंख्याही घटली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.