उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू

  • कमल राणी वरुण योगी सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री होत्या. राज्यमंत्री कमल राणी वरुण यांची प्रकृती खालावली होती. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याचा अहवाल १८ जुलैला आला होता.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचे रविवारी निधन झाले. १८ जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. युपीची राजधानी लखनऊ येथील एसजीपीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मंत्र्याचा हा पहिलाच मृत्यू आहे.

कमल राणी वरुण योगी सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री होत्या. राज्यमंत्री कमल राणी वरुण यांची प्रकृती खालावली होती. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याचा अहवाल १८ जुलैला आला होता. हा अहवाल समोर आल्यानंतर त्यांना एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले.

कमल राणी यांच्या मृत्यूमुळे समाजाचे मोठे नुकसान : योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मृत्यूवर नम्र श्रद्धांजली अर्पण करतांना कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आहे. योगी म्हणाले, ‘त्यांच्यावर अनेक दिवसांपासून राज्यातील नामांकित वैद्यकीय संस्था एसजीपीजीआयमध्ये उपचार सुरू होते. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. आज सकाळी त्यांचे दु: खद निधन झाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कमल राणी वरुण एक लोकप्रिय जन नेता आणि ज्येष्ठ समाजसेवक होत्या.  त्या ११वी आणि १२ व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. २०१७ मध्ये कानपूर नगरातील घाटमपूरमधून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. मुख्यमंत्री म्हणाले की कमल राणी वरुण यांनी मंत्रिमंडळात अत्यंत कार्यक्षमतेने काम केले. त्यांच्या मृत्यूने समाज, सरकार आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

यूपीमधील कोरोना प्रकरणे ३६,००० पार

उत्तर प्रदेशात कोरोनाव्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात कोरोनाचे ३ हजार ८४० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४७ लोक मरण पावले. आता राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या ३६ हजार ३७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १ हजार ६७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.