दिल्लीत १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू, ७७ केंद्रांवर दिली जातेय लस

दिल्लीत ७७ केंद्रांवर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय. दिल्लीतील लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून यात ९० लाख नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. सध्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असून त्याशिवाय केंद्रांवर प्रवेश दिला जात नाहीय. 

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली होती. १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण उपलब्ध होईल, अशी घोषणा होती. मात्र घोषणा झाली, तरी प्रत्यक्षात लसींचा पुरवठाच नसल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू झालेलं नाही. दिल्लीत मात्र आजपासून (सोमवार) १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झालीय.

    दिल्लीत ७७ केंद्रांवर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय. दिल्लीतील लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून यात ९० लाख नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. सध्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असून त्याशिवाय केंद्रांवर प्रवेश दिला जात नाहीय.

    दरम्यान, दिल्लीत ३ खासगी हॉस्पिटल चेनमध्येदेखील लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झालीय. अपोलो, फोर्टिज आणि मॅक्स या हॉस्पिटल चेन्समध्ये सध्या लसीकरण सुरू आहे. शनिवारपासूनच ही हॉस्पिटल्स लसीकरण करत आहेत.

    दिल्ली राज्य सरकारनं १ कोटी ३४ लाख लसींची मागणी नोंदवली असून पुढील ३ महिन्यांत या लसी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. यापैकी ६७ लाख लसी दिल्लीच्या सीरम इन्स्टिट्यूटकडून वितरित करण्यात आल्या आहेत. पुढील तीन महिन्यांत सर्व प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्याची योजना असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.