१८ ते ४४ वयोगटाला कोरोना लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक, त्याशिवाय केंद्रावर प्रवेशच मिळणार नाही

यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं लसीकरणासाठी नोंदणी केली जात होती. मात्र थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आधार कार्ड दाखवून लसीकरण करता येत होतं. आता मात्र ही सुविधा नसणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलंय. 

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलाय. दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता असून हा आकडा आता दैनंदिन ३ लाखांच्या वर पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू होतंय. मात्र ही लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलंय.

    यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं लसीकरणासाठी नोंदणी केली जात होती. मात्र थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आधार कार्ड दाखवून लसीकरण करता येत होतं. आता मात्र ही सुविधा नसणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलंय.

    १८ ते ४४ वयोगटातील नागरिक २८ एप्रिलपासून लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतील. खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करायचं असेल, तर पैसे मोजून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध असेल. सरकारी आणि खासगी असे दोन्ही पर्याय रुग्णांना उपलब्ध असतील. मात्र सरकारी केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही एकमेव पद्धत असणार असून थेट केंद्रावर जाऊन  लस मिळवण्याचा पर्याय आता उपलब्ध असणार नाही.

    महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आलीय. मात्र खासगी रुग्णालयातही हे डोस उपलब्ध असणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस राज्य  सरकारांना ४०० रुपये, तर खासगी हॉस्पिटल्सना ६०० रुपये या दरानं विकत मिळणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपयांना तर खासगी हॉस्पिटल्सना १२०० रुपये दरानं मिळणार आहे.

    प्रत्येक केंद्राला त्या त्या केंद्रावर उपलब्ध असलेली लस, कंपनी आणि इतर तपशील सांगणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आपण नेमकी कुठली लस घेतो आहोत, याची इत्यंभूत माहिती मिळू शकेल. एकापेक्षा अधिक लसी उपलब्ध असतील, तर नागरिकांना निवडीचं स्वातंत्र्यही मिळेल.