प्रदेशाध्यक्षपद द्या, मंत्रीपद सोडतो, वडेट्टीवारांच्या प्रतिक्रियेने काँग्रेसमध्ये नवी चर्चा

काँग्रेसने प्रत्येक राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत अदलाबदल करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आपल्याला पक्षानं प्रदेशाध्यक्षपद दिल्यास आपण मंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचं वडेट्टीवर यांनी म्हटलंय. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसमध्ये बदलांचे वारे वाहत असल्याचं स्पष्ट झालंय.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चेने गेल्या काही दिवसांत वेग घेतलाय. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून ती जबाबदारी काढून इतरांना देण्यात असल्याची जोरदार चर्चा आहे.

काँग्रेसने प्रत्येक राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत अदलाबदल करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आपल्याला पक्षानं प्रदेशाध्यक्षपद दिल्यास आपण मंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचं वडेट्टीवर यांनी म्हटलंय. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसमध्ये बदलांचे वारे वाहत असल्याचं स्पष्ट झालंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलासाठी सुरु असलेल्या लॉबिंगमुळे बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.काँग्रेसमध्ये होत असलेल्या सततच्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नाराज बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि लॉबिंगमुळे नाराज

राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात आणि काँग्रेसने याला पाठिंबा द्यावा यात बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका बजावली होती. तसंच त्यांच्याच नेतृत्त्वात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक होती.बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता अशी दोन पदे आहेत. तसेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते महसूल मंत्री आहेत. यामुळे महाराष्ट्रतील काँग्रेसचे नेते नाराज असून त्यापॆकीच काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा आहे. पक्षातील इतर नेत्यांच्या या मागणीमुळे बाळासाहेब थोरात नाराज असून अखेरीस त्यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजतं आहे.

आधीही दोन वेळा प्रदेशाध्यक्ष सोडण्याची तयारी

यापूर्वीही बाळसाहेब थोरात यांनी दोनदा काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी दिल्लीच जाऊन तसं कळवलं देखली होतं. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या मुंबईत दौऱ्यातही थोरात यांनी त्यांच्यासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मानसिकता बोलून दाखवली होती.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणकोण?

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला तर या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसप्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत असल्याचं समजतं. याबाबतचा निर्णय या महिन्यातच अपेक्षित आहे.