८ टप्प्यातच होणार मतदान; बंगाल : निवडणूक आयोगाचा निर्णय कायम

भाजपावर हल्लाबोल करण्यासाठी तृणमूलने ‘खेला होबे’ची घोषणा दिली आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही ‘व्होट फॉर मोदी दादा’ चे पोस्टर्स बंगालमध्ये लावले आहेत.

  दिल्ली: बंगालमध्ये ८ टप्प्यातच विधानसभा निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. या निवडणुकीला विरोध करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. वकील. एम.एल. शर्मा यांनी ८ टप्प्यात निवडणुका घेतल्यास घटनेतील कलम १४ आणि कलम २१ चे उल्लंघन होत असल्याचा दावा केला होता. याचिकाकर्त्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने कोलकाता हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता. तथापि शर्मा यांनी ही याचिका निवडणुकीसंदर्भात नसून यासंदर्भातील एका निर्णयाच्या दाखल्याच्या आधारावर सादर केली असल्याचे सांगितले होते. एक पक्ष धार्मिक घोषणांचा वापर करीत असताना हायकोर्टात का जावे असा सवालही त्यांनी केला होता. तथापि कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली.

  ममतांनाही आक्षेप
  विशेष म्हणजे आठ टप्प्यात होत असलेल्या या निवडणुकांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही आक्षेप घेतला होता. आसाममध्ये केवळ तीन टप्प्यातच मतदान होत असून अन्य तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत असल्याकडे लक्ष वेधले होते.

  पत्नी उमेदवार, पोलिस अधीक्षकांना हटविले
  निवडणूक आयोगाने हावडा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सौम्या राय यांना पदावरून हटविले आहे. राय यांची पत्नी बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहे. त्यांना तृणमूलने दक्षिण २४ परगणातील सोनापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नियमानुसार कोणत्याही उमेदवाराचा कौटूंबीक सदस्य निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असू शकत नाही त्यामुळे आयोगाने अधीक्षकांना पदावरून हटविले.

  भारती घोष यांच्या अटकेला स्थगिती
  भाजपा उमेदवार आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते. त्यास त्यांनी आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी दोन महिन्यांसाठी स्थगित केली. भाजपाने घोष यांना पश्चिम मेदिनापूर जिल्ह्यातील डेबरा मतदारसरंघातून उमेदवारी दिली आहे.

  भाजपाचे ‘मोदी दादा’ पोस्टर
  यंदाची बंगाल विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. मुख्यमंत्री बॅनर्जींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे तर ममतांनीही भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. भाजपावर हल्लाबोल करण्यासाठी तृणमूलने ‘खेला होबे’ची घोषणा दिली आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही ‘व्होट फॉर मोदी दादा’ चे पोस्टर्स बंगालमध्ये लावले आहेत.