While farmers are crouching on the streets in the bitter cold, ministers and leaders say

कडाक्याच्या थंडीत शेतकरी रस्त्यावर कुडकुडत असताना मंत्री आणि नेते म्हणतात ५०० संघटना एका रात्रीत उगवल्या, दलालांच्या हाती आंदोलनाची सूत्रे. राजकीय नेत्यांची अपमानास्पद विधाने.

दिल्ली : जम्मू काश्मिर आणि हिमाचल प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे दिल्लीत थंडीची लाट पसरली आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानीतील तापमानातही घट झाली आहे. मंगळवारी सकाळी किमान तापमानात ४ डिग्रीपर्यंत खाली घसरले होते. मंगळवारी सकाळी दिल्लीचे तापमान ४.१ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. हवामान खात्याने आगामी दोन दिवस तापमानात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ दिल्लीत कडाक्याच्या थंडीची लाट येणार असल्याचे समजते. एकीकडे दिल्लीत पारा घसरत आहे तर दुसरीकडे कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनाचे २० दिवसही पूर्ण झाले आहेत. भर थंडीतही शेतकरी अद्यापही दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले आहेत.

एकीकडे पारा खाली घसरत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील तिढाही कायमच आहे. सराकर शेतकऱ्यांसोबत आमने-सामने चर्चा तर करीत आहे सोबतच मागच्या दारानेही शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सिंधू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी ठाम मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी त्यांनी सोमवारी उपोषणही केले आहे. भर थंडीतही शेतकरी कुडकुडत असताना सरकारच्या हृदयाला मात्र पाझरच फुटत नसल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकशाही प्रक्रियेत केवळ चर्चेद्वारेच तोडगा काढला जाऊ शकतो असे स्पष्ट केले. कायदे रद्द करणे हा पर्याय नाही असेही ते म्हणाले.

टिकैत यांचा हल्लाबोल

केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा तर करीत आहे परंतु ते त्यांच्यासोबत चर्चा करीत आहे जे मुळातच शेतकरी नाहीत असा दावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला. खरा शेतकरी तर दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर बसला असून तेथेच सरकारचे प्रतिनिधी चर्चा करण्यास जात नाही असे ते म्हणाले.

राजकीय नेत्यांची अपमानास्पद विधाने;  ५०० संघटना एका रात्रीत उगवल्या

एकीकडे शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे तर दुसरीकडे, या आंदोलनाच्या मुद्यावर काही राजकीय नेत्यांनी बरळणेही सुरू केले आहे. मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी आंदोलक शेतकरी नसून विदेशी शक्तींचे त्यांना पाठबळ असल्याचा दावा केला. 500 शेतकरी संघटना एका रात्रीत उगवल्या असून हे शेतकरी नाही तर दलाल आहेत व देशविरोधी संघटनांसोबत त्यांचा संबंध आहे असा दावा त्यांनी केला.

दलालांच्या हाती आंदोलनाची सूत्रे

पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवित आहेत. डाव्या विचारसरणीचे लोक आणि तुकडे-तुकडे गँग यामध्ये सामील झाली असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये गँग कधीही यशस्वी होणार नाही. खोटा कट रचणे फार काळ टिकणार नाही, असे उषा ठाकूर म्हणाल्या. भाजपाने आता शेतकऱ्यांचा भ्रम दूर करण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे, असे उषा ठाकूर म्हणाल्या.