कोरोनाबळींच्या वारसांना ४ लाख रुपये देण्याचा आदेश निघाला, पण पैसे मात्र मिळत नाहीत, हे आहे खरं कारण !

सरकारनं गेल्या वर्षी १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढलं. यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र त्यानंतर काही तासांतच सुधारित परिपत्रक काढण्यात आलं. त्यात मात्र या आर्थिक मदतीचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे ही मदत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं.

    देशात गेल्या वर्षी कोरोनाच्या लाटेचा उद्रेक सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारनं एक मोठी घोषणा केली होती. देशातील कोरोना बळींच्या वारसांना ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारनं परिपत्रक काढून केली होती. मात्र प्रत्यक्षात ही मदत मिळत नसल्याचं दिसतंय. त्याला सरकारनं काढलेलं सुधारित परिपत्रक हेच कारण असल्याचं आता समोर आलंय.

    सरकारनं गेल्या वर्षी १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढलं. यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र त्यानंतर काही तासांतच सुधारित परिपत्रक काढण्यात आलं. त्यात मात्र या आर्थिक मदतीचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे ही मदत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं.

    मुंबईतील ग्राहक पंचायतीकडे अशा तक्रारी येऊ लागल्यानंतर तपास केला असता ही बाब लक्षात आली. पहिल्या घोषणेची देशभर चर्चा झाली, मात्र दुसऱ्या आणि सुधारित परिपत्रकाबाबत काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे अनेकजण आपल्याला मदत मिळेल, या अपेक्षेनं मदतीची वाट पाहत राहिले. प्रत्यक्षात मात्र ती मिळणारच नव्हती, हे आता स्पष्ट झालंय.

    राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील या बाबींची माध्यमांकडे खातरजमा केलीय. दोन्ही परिपत्रके खरी असून सुधारित परिपत्रकातील बाबींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असल्यामुळे मदत मिळण्याची शक्यता नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.