facebook crime
facebook crime

हेमलताने त्याच्या घरी येण्यात रस दाखवला. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवलं. तरुण घरी आला असता, त्याला धक्काच बसला.

    नवी दिल्ली: सोशल मीडियावर फ्रेंडशिप अनेकांना महागात पडली आहे. अशातच फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला घरी बोलावणं दिल्लीतील तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. बायकोच्या अनुपस्थितीत घरी आलेली फेसबुक फ्रेण्ड चक्क सोनं लुटून पसार झाली. सामान आणण्याच्या बहाण्याने तिने तरुणाला घराबाहेर पाठवलं आणि संधीचा फायदा घेत तिने त्याच्या पत्नीचे दागिने आणि २२ हजार रुपयांसह पोबारा केला.

    दिल्लीतील त्रिलोकपुरी राहणाऱ्या पीडित तरुणाची आरोपी तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यामुळे तरुणाने तिला घरी बोलावलं. तरुणीने चलाखीने त्याला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवलं. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ती दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली. तरुणाने तिला फोन केला, तेव्हा त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. कल्याणपुरी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

    तक्रारदार तरुण त्रिलोकपुरी भागात पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लखनौमध्ये राहणाऱ्या हेमलता पाठक नावाच्या तरुणीशी त्याची फेसबुकवर ओळख झाली. तिने आपण ज्योतिषी असल्याचं तरुणाला सांगितलं होतं. सुरुवातीला चॅटिंग झाल्यानंतर दोघांनी नंबर शेअर केले. दोघांमध्ये गप्पा वाढल्या. तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता. अनेक वेळा ते दिल्लीत भेटले होते.

    तक्रारदार तरुणाची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. हेमलताने त्याच्या घरी येण्यात रस दाखवला. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवलं. तरुण घरी आला असता, त्याला धक्काच बसला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं. घरातील लॉकर उघडा होता. पत्नीचे दागिने आणि २२ हजार रुपये गायब झाले होते.