दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे देशभरात पडसाद

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात उमटले तीव्र पडसाद

 

हरियाणाच्या कृषीमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

हरयाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल आणि स्थानिक पत्रकारास गोळी मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित पत्रकाराने पोलिस अधीक्षक सुमेर प्रताप यांच्याकडे तक्रार दाखल केली असून गृहमंत्री अमित शाह, हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनाही पत्राद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात धमकीचा फोन हिसार जिल्ह्यातील शिकारपूर गावातून आला अल्याचे निष्पन्न झाले. ज्या क्रमांकावरून हा फोन करण्यात आला तो उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे समजते. उल्लेखनीय असे की हरियाणाचे कृषीमंत्री दलाल यांनी शेतकरी आंदोलनात विदेशी शक्तींचा हात असल्याचा दावा केला होता. त्यावरून वाद झाला होता.

डीएमकेचेही चेन्नईत आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देत डीएमकेनेही चेन्नईत जोरदार देण्यासाठी केले. हे आंदोलन पक्षाचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही समावेश होता. स्टॅलिन यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्यांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचाही सहभाग होता.

झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
धान खरेदीस स्थगिती देण्यात आल्याच्या निर्णयाचा विरोध करीत येथील भाजपा कार्यकर्त्यानी पाकूड येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा पुतळा जाळला. भाजपा नेत्यांनी सरकारविरोधात निदर्शने करतानाच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. जिल्हा भाजपा अध्यक्ष बलराम दुबे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. झारखंड सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या तुघलकी फर्मानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे असे ते म्हणाले.

हिंमत असेल तर रोखून दाखवा -तेजस्वींचे नितीशांना आव्हान 

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या पाटणातील गांधी मैदानात होत असलेल्या आंदोलनास नितीश सरकारने बंदी घातली आहे. प्रशासनाने गांधी मैदान आंदोलनाचे स्थळ नाही असे सांगत ही कारवाई केली आहे. तथापि चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर राजद, काँग्रेस व डाव्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी धरणे दिले. दुसरीकडे तेजस्वींनीही आंदोलन स्थळी जाण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हानही दिले. गोडसेची पूजा करणारे लोक पाटणात आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणातील गांधी मैदानात गांधींचा पुतळाच बंदिस्त केला अशी टीका त्यांनी केली.