Dhingana of drunken woman on Mumbai-Agra highway; Direct put his hand to the police collar

    धुळे : एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा टोलनाक्याजवळ धिंगाणा घातला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विचारपूस सुरु केली असता महिलेने पोलिसांची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुन्या टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शीतलपासून पुढे असलेल्या महामार्गालगत हा प्रकार घडला. 40 वर्षीय महिला अलका किशोर पाटील आणि तिचा दीर भूषण ज्ञानेश्वर पाटील हे रस्त्यावर गोंधळ घालत होते.

    या ठिकाणी गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्या पुरुषाला विचारणा करत असताना महिलेने उलट पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी दारुच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.