धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बॅंकेच्या सभेत विभाजनाच्या मुद्यावरून खडाजंगी

धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत आज बँक विभाजनाचा मुद्दा चांगलाच गाजला. नंदूरबारचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा बँकेचे विभाजन करुन नंदूरबार जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हा बँक स्थापन करण्याचा ठराव आजच्या सर्वसाधरण सभेत मंजूर करावा, अशी मागणी केली.

    धुळे (Dhule). धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत आज बँक विभाजनाचा मुद्दा चांगलाच गाजला. नंदूरबारचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा बँकेचे विभाजन करुन नंदूरबार जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हा बँक स्थापन करण्याचा ठराव आजच्या सर्वसाधरण सभेत मंजूर करावा, अशी मागणी केली. तर विद्यमान चेअरमन माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्हा बँकेचे विभाजन करणे हे सर्वस्वी राज्य सरकारच्या हातात असून सत्तेत असलेल्या चंदूभय्यांनी आधी राज्य सरकारकडून बँकेच्या विभाजनाची मंजूरी आणावी, असे आवाहन केले.

    धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६३ वी सर्वसाधरण सभा आज शनिवार दि. २७ रोजी धुळ्यातील व्यंकटेश लॉन्स येथे घेण्यात आली. या सभेत बँकेचे संचालक तथा शिवसेनेचे माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी बँकेच्या विभाजनाचा मुद्दा उचलून धरला. तत्पुर्वी नंदूरबार जिल्ह्यातील बँकेच्या संचालकांनी चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांना बँक विभाजनाचा ठाराव आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन दिले.

    सभेत बोलतांना संचालक चंद्रकांत रघूवंशी म्हणाले की, धुळे आणि नंदूरबार जिल्हा विभाजन होवून २२ वर्षे झाली आहेत. नुकत्याच विभाजीत झालेल्या पालघर जिल्हात बँकेचे विभाजन केले गेले आहे. मी स्वतः १५ वर्षापासून बँकेचा संचालक आहे. गेल्या २० ते २५ वर्षापासून आपण आम्हाला सांभाळत आहे. धुळे जिल्ह्याने मोठ्या भावाची भुमिका आजपर्यंत बजावलेली आहे. तीच भूमिका स्विकारुन नंदूरबार जिल्ह्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण बँक विभाजनाचा ठराव पारित करुन शासनाला सादर करावा. आम्हाला माहित आहे की, विभाजनाचा निर्णय सरकारकडून घेतला जाईल मात्र आपण तसा ठराव पारित केल्यास शासनाला निर्णय घ्यावा लागेल. जे व्हायचे ते होईल पण आम्ही आजही कदमबांडे यांच्या सोबतच आहोत.