जिल्हा रुग्णालयासह अजमेरा कोविड हेल्थ सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कोरोना बाधित रुग्णांशी पुन्हा साधला संवाद

धुळे : जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज सायंकाळी आज अजमेरा आयुर्वेदिक रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा रुग्णालयातील विविध कक्षांना भेट देत पाहणी केली. तसेच पीपीई कीटक घालून कोरोनाविषाणू बाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.

 यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यादव यांनी अजमेरा आयुर्वेदिक रुग्णालयातील रुग्ण तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांची पीपीई कीट घालून संवाद साधला.

अजमेरा आयुर्वेदिक रुग्णालयातील सेंटरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३ रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी वैद्यकीय व्यावसायिक औषधोपचार करणार आहेत. त्याचाही जिल्‍हाधिकारी  यादव यांनी आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनयुक्त बेड चे काम रविवार सायंकाळपर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल आपणास सादर करावा. कोरोनाविषाणू बाधितत रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करून त्यांना दिलासा द्यावा. उपलब्ध मनुष्यबळाचे परिपूर्ण नियोजन करावे. कोरोनाविषाणू बाधित रुग्णांवर औषधोपचार करताना हलगर्जीपणा करणाऱ्यांवर  तात्काळ कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिले.