मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमदार शाह यांचे आंदोलन

धुळे:  राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या विधानसभा अधिवेशनाच्या वेळी धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह (doctor faruk shah) यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,अशा घोषणा देत मुंबई(mumbai) येथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बॅनर झळकावून आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश क्र. १४ नुसार मुस्लीम समाजाला राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५(४), १५(५), १६(४) व ४६ मधील तरतुदीनुसार विशेष मागासप्रवर्ग अ निर्माण करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटाचा समावेश करण्यात आला होता. तसेच ५० मुस्लीम मागास जातींना यामध्ये स्थान देण्यात आले होते.मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा जाणूनबुजून प्रलंबित ठेवण्यात आला. याविरुद्ध धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी नागपूर अधिवेशनातसुद्धा मुस्लीम समाजाला ५% आरक्षण मिळावे अशी जोरदार मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज विधानभवन मुंबई येथे मुस्लीम समाजाला ५% आरक्षण मिळायलाच पाहिजे या आशयाचे बॅनर झळकावून निदर्शने करण्यात आली.