maratha andolan

धुळे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय धुळ्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यात आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता बुधवारी सायंकाळी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी आरक्षणांच्या प्रश्‍नावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे कायदेशीर लढ्या बरोबरच न्यायालयाच्या बाहेरदेखील दबावगट निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात २ अाॅक्टाेबर रोजी जिल्हाभर एकाच वेळेस आमदार, खासदार घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात २ अाॅक्टाेबर राजी सकाळी १० वाजेल शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या घरा समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर धुळे तालुक्यातील क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थाना बाहेर, तर िशरपूर तालुक्यात आमदार काशिराम पावरा यांच्या निवासस्थांना बाहेर, शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा येथे आमदार जयकुमार रावल यांच्या निवासस्थानाबाहेर, साक्री येथे आमदार मंजुळा गावीत यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

धरणे आंदोलनाच्या नंतर ५ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनांमध्ये मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, साहेबराव देसाई, मराठा पंच मंडळ अध्यक्ष राजेंद्र इंगळे, क्रांती मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव निंबा मराठे, खजिनदार विरु मोरे, मराठा महासंघाचे जगन ताकटे, डॉ संजय शिंदे, बी ए पाटील, नाना कदम, दिलीप शितोळे, संजय बगदे, हेमा हेमाडे, चंचल पवार, ज्ञानेश्‍वर पाटील, आर्जुन पाटील, रवी शिंदे, राजेंद्र ढवळे, संदीप पाटोळे, श्याम निरगुळे, दीपक रवंदळे, आनंद पवार, अमर फरताडे, यशवंत हरणे, विरेंद्र मोरे, अमोल भागवत यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.