Sanjay Yadav, Collector of Dhule district
धुळेचे जिल्हाधिकारी संजय यादव

  • प्रत्येक नागरिकाची होणार आरोग्य तपासणी, आरोग्य पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन

धुळे (Dhule). धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम मंगळवार १५ सप्टेंबर २०२० पासून धुळे जिल्ह्यात दोन टप्प्यात राबविण्यात येईल. ही मोहीम मिशन मोडवर राबवावी. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येईल. कोरोना विषाणूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावयाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश धुळेचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, शांताराम गोसावी आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाड्यापर्यंत आरोग्य विभागाचे पथक पोहोचेल. हे पथक प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करेल. कोमॉर्बिड आजाराचा रुग्ण असल्यास उपचार व नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात येईल. दोन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येईल. गृहभेटीसाठी आरोग्य पथके संबंधित आरोग्य यंत्रणेने तयार करावीत. एका पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश असेल. हे पथक दररोज किमान 50 घरांना भेट देईल. या तपासणीत व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजनची तपासणी करण्यात येईल. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजनची पातळी कमी असेल, अशा कोरोना सदृश आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये दाखल करावे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले.

दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा दुसरा टप्पा १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तो २४ ऑक्टोबर २०२० रोजी पूर्ण होईल. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाबरोबरच नागरिकांनी सहभागी व्हायचे आहे. या मोहिमेचे वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षण करतील. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे. या मोहिमेचा दर आठ दिवसांनी आढावा घेण्यात येईल. कोरोना विषाणूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवावे. अतिजोखमीचे रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. यावेळी महापौर सोनार, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. रंधे, आमदार पावरा, आमदार गावित आदींनी विविध सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी या मोहिमेचे प्रास्ताविक केले.