15 ऑगस्टला मंत्रिपदावरून काढा; आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवींची मिश्किल प्रतिक्रिया

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडील मंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्या संदर्भात स्वत: पाडवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे मंत्रिपद काढूनच घ्यायचे असेल तर, 9 किंवा 15 ऑगस्ट रोजी काढा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

    धुळे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडील मंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्या संदर्भात स्वत: पाडवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे मंत्रिपद काढूनच घ्यायचे असेल तर, 9 किंवा 15 ऑगस्ट रोजी काढा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

    मंत्रिपद जाणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझे मंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मला त्याविषयी काहीही माहिती नाही. वरिष्ठांशी मी याबाबत चर्चा केली. पण त्यांनाही याबाबत काहीही माहिती नाही, असे पाडवी म्हणाले.

    मी चार वेळा मंत्रिपद नाकारले आहे. तसेच एकदा पक्षाचे उपाध्यक्षपदही नाकारलेले आहे. त्यामुळे अशा बातम्यांचा राग येत नाही आणि त्याबद्दल काही वाटतही नाही. पक्ष नेतृत्वाचा आदेश मी कायम मान्य केलेला आहे आणि यापुढेही पक्षाच्या आदेशानुसार काम करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.