bhartiya sanvidhan

सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले होते. त्यामुळे हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान(bhartiya sanvidhan) २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले होते. त्यामुळे हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.  या संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी मात्र २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली. या संविधानाविषयीच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

संविधान सभेला संविधानाचे एकूण काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला. तर ते लिहीण्यासाठी ६ महिने लागले. तुम्हाला हे माहीती आहे का की, आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं त्यांनी ते कॅलिग्राफीमध्ये लिहीले. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

मसुदा समितीने २९ऑगस्ट १९४७ पासून संविधान निर्मितीच्या कामाला सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान यांनी संविधानाचा मसुदा तयार केला आहे.संविधानासाठी ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. त्यानंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

फाळणीनंतर संविधान समितीच्या सदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

संविधान दिनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्याची पद्धत आहे.