आज सर्वपित्री अमावस्या ! पितृ स्मरण दिन

काक स्पर्श घडावे हे पुण्यादायी कार्य

भारतीय सनातन हिंदू संस्कृती धर्म परंपरे नुसार मातृ देवो! भव पितृ देवो भव !! ज्या जन्म दात्यांनी आपल्याला जन्म देवून ही जग दुनिया दाखविली त्या आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचे श्राद्ध, ज्या अमावस्येला केले जाते; आज दि.१७/सप्टेंबर २०२० गुरुवार रोजी तीच ही सर्व पितृमोक्ष अमावस्या!

या सर्व पितृमोक्ष अमावस्येला आपण आपल्या सर्व पितरांचे श्रध्देने श्राध्द करुन एकप्रकारे त्यांची आठवण काढतो व तृप्त करतो ! हिंदू धर्मशास्त्रानुसार “कावळा” या पक्ष्याच्या माध्यमातून आपण आपल्या पितरांना मोठ्या श्रध्देने जेवू घालून, त्यांना तृप्त करीत असतो!

 सर्वपित्री अमावस्येला केलेल्या श्राद्धाचे महत्व…

सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानल्या जातो, भारतात बहुतांश भागात सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या सुद्धा म्हणतात. जी पित्रे पौर्णिमेच्या तिथीला, चतुर्दशीला तसेच अमावस्येला मरण पावले असतील अश्या तिन्ही तिथींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते. तसेच जर  वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या-त्या तिथींना करण्यास जमत नसेल तेंव्हा मृतामांच्या शांतीसाठी सगळ्या पित्रांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात. तसेच जर आपल्याला पित्रांच्या मृतूची तिथी माहिती नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध अमावस्येला करू शकतो आणि म्हणूनच या अमावस्येच्या तिथीला सर्व पित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात. जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला अनंतात विलीन होतात अशा पित्रांचे श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेला न करता अमावसेला करतात.

या अमावस्येला सर्वपित्री श्राद्ध केले जाते. या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसंच इतर मृत नातलग यमलोकातून आपल्या नातेवाइकांकडे येतात. या काळात ते आपल्या अवती भवती वास्तव्य करून राहातात अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात. या श्राद्धकर्मांमधून पितरांबद्दल आदर राखला जातो. यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते. तसंच ज्यांच्या मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते, त्यांचंही श्राद्ध या दिवसांमध्ये केलं जातं. पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ पितराला पाहूणचार देण्याचा पितृ पंधरवाड्यातील हा शेवटचा दिवस असतो.

या दिवशी सकाळी तयार केल्या जाणार्‍या स्वयंपाकात आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून केले जातात. मुख्यत्वे करून जेवणात दही, वरण-भात, उडदाचे वडे, खीर इ. असावे. ज्यांच्या घरी पूर्वापार ब्राह्मण निमंत्रित करून श्राद्ध करण्याची पद्धत आहे त्यांनी विधीवत श्राद्ध करून गोग्रास(गाईला घास) , श्वानबली(कुत्र्याला जेवण) व काकबळी (कावळ्याला जेवण) केळीच्या पानावर द्यावा. इतरांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या प्रथेनुसारच विधी करावा.

(“बळी म्हणजे प्राण्याला मारणे” हा समज काही समाज कंटकांनी कुटनीतीपूर्वक आपल्यात रूढ केला). पितरांना मटण, दारू, विडी अर्पण करणे हा आपल्या संस्कृती चा भाग नाही. काही अल्पज्ञ म्हणतात की श्राद्ध करण्यापेक्षा अमुक करावं तमुक करावं किंवा शास्त्रानुसार न करता आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा. अश्यांच्या भानगडीत पडू नये, तसे केल्यास अधोगतीच प्राप्त होते.

माझ्या आई – वडिलांनी मला नीट सांभाळले नाही , माझे सासु-सासरे माझ्याशी नीट वागले नाही, मी आई-वडिलांचे कधी ऐकले नाही- त्यांची जिवंतपणी सेवा केली नाही, मान दिला नाही म मी कशाला करू त्यांचे श्राध्द ??? काहींच्या मनात असे विचार येतात. त्यांना सांगावेसे वाटते की जर तुम्ही आधी चुकला असाल तर आता परत का चूक करत आहात ? किमान आता तरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा . आणि जर पूर्वजांनी तुम्हाला नीट वागणूक दिली नसेल तरी तुम्ही तुमचे कर्तव्य सोडू नका. सर्वपित्री च्या दिवशी देव-देश आणि धर्मासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या यापल्या पुण्यात्मा पूर्वजांना कधीच विसरू नका, त्यांचा आदर्श ठेवा. त्यांची प्रार्थना करून अवश्य आशीर्वाद प्राप्त करा

रविंद्र कान्हेकर