Diwali is also celebrated in a modern way in rural areas; Out of date

विक्रमगड : दिवाळीसाठी (diwali) लागणारे पणत्या, उटणे,फराळ आदी बाजारपेठेत तयार मिळु लागल्याने शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दिवाळीला आता आधुनिक स्वरुप आले आहे.

गावाकडील पंरपरा चालीरिती जुने साहित्य याचा वापर कमी झाला असून, मनुष्य सध्याच्या आधुनिक युगामध्ये घडयाळयाच्या काटयाप्रमाणे जलद झाला आहे. त्याच्याजवळ आता वेळच उरलेला नाही. मग कसल्या आल्या परंपरा आणि चालिरीती? लगेच बाजारात जायचे आणि तयार वस्तु विकत घ्यावयाचा यामुळे वेळही वाचतो आणि मेहनत नाही.

विक्रमगड तालुक्यातील शेतकरी भात, गवत विकुन मोठया आनंदात दिवाळी साजरी करायचे शेतमजुरांनाही याचवेळी मजुरी मिळत असल्याने तेही उत्साहात सण साजरे करतात. पूर्वी ग्रामीण भागात दिवाळीच्या 10 दिवस आधी घराच्या साफसफाईला, रंगरंगोटीला सुरुवात होत असे,घरासमोर अंगण शेणाने व लालमातीने सारवले जात होते. रांगोळया काढण्यासाठी घरासमोर ओटा मेहनत घेवुन बनविला जात असे.

दिवाळीत खासकरुन शेणाच्या आणि चिबडाच्या(काकडीसारखे छोटे चविला कडु असलेले नैसर्गीक फळ) त्यापासुन पणत्या बनविल्या जात असे. घरातच साहित्य जमा करुन आयुर्वेदिक उटण्याचे मिश्रण पाटयावर वाटले जात असे.

दिवाळीची सुरुवात म्हणुन घरासमोरील अंगणात देवाचे, भाताचे कणीस, निसणीची चित्रे काढुन पुजा केली जात असे. त्याला आठीगळयाचा सण म्हणुंन संबांधले जात असे. विक्रमगड व परिसरात घरोघरी आपटयाच्या पानात काकडी पासुन बनविलेले पानमोडया हा पदार्थ बनला जात असे.  परंतू, सध्याच्या आधुनिक युगामध्ये अपवाद वगळता दिवाळीला आधुनिक स्वरुप आल्याने हे कालबाहय होतान दिसत आहे. घरासमोर बनविलेल्या ओटयावर रांगोळी काढुन शेणाच्या, चिबडयाच्या पणत्या प्रज्वलित केल्या जात असत. घरासमोरील अंधार दुर व्हावा हा त्या मागचा मुख्य उद्देश असे.

गोड पदार्थ बनवुन घरातील सर्वाना खायला देवुन घरातील कटुता दुर केली जात असे येथील जुने जाणकारांकडुन आजही सांगण्यात येते. मात्र, आता ग्रामीण भागातही दिवाळीचा फराळ बाजारात विक्रीसाठी येवु लागल्याने तो माघारी बनविणे कमी झाले आहे. सकाळी लवकर उठुन हाताने एकदोन तास रांगोळी काढत बसण्यापेक्षा बाजारात 50 ते 100 रुपयांना मिळणारे रांगोळीचे साचे आणुन पाच मिनिटांत आकर्शक रांगोळी काढणे सोयीचे झाले आहे. पाटयावर वाटुन उटणे बनविण्यापेक्षा 25 ते 50 रुपयांना तयार उटणे खरेदी केले जात आहे.

आधुनिक युगाच्या काळात आता सारेकाही तयार व सुंदर, आकर्षक स्वरुपात कमी वेळेत उपलब्ध होउ लागल्याने जुन्या जमातील साजरी होणारी दिवाळी लोप पावत आहे. आत्ताच्या दिवाळीला आधुनिक स्वरुप प्राप्त झाले आहे.