Black money

केंद्र सरकारकडे भ्रष्टाचाराच्या ४० हजार तक्रारी आलेल्या आहेत. वेबसाईटवर १ लाख ६७ हजार तक्रारी करण्यात आल्या, परंतु त्यातील १ लाख ५० हजार तक्रारीकडे शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

भ्रष्टाचाऱयांना काळ-वेळ नसते. गरीब असो की श्रीमंत, लाचखोरी करण्यासाठी ते कुठलाच भेदभाव करीत नाही. कोरोना महामारीमध्येही भ्रष्टाचाऱ्यांच्या कारवाया सुरूच होत्या. माणुसकीच्या नात्याने कोरोना संकटकाळात सेवा करण्याऐवजी अनेकांनी भ्रष्टाचार आणि लाचखोरी केलेली आहे. एकीकडे कितीतरी डॉक्टर्स, परिचारका, पोलिस जीवावर उदार होऊन लॉकडाऊनच्या काळात जनसेवा करीत होते. तर दुसरीकडे कित्येक भ्रष्टाचाऱ्यांनी शासकीय निधीचा अपहार केला. अनेकांनी काळी कमाई केली.

या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या आहेत. जनतेच्या असहायतेचा फायदा आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कित्येक अधिकाऱ्यांनी घेतला. कोरोनाच्या काळात ज्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यामध्ये ‘व्हीसा’ मिळविण्याबाबतच्या आहेत. विदेशातील कित्येक भारतीयांना देशात आणायचे होते, त्यासाठी त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून द्यायच्या होत्या. याशिवाय रुग्णालयातही त्यांना पुरेशा सुविधा करून द्यायच्या होत्या. परंतु रुग्णालयात दाखल कोरोनाच्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर बिल वसूल करण्यात आले. ‘पीएम केअर्स निधी’मध्ये दान करण्यासाठी इच्छुक व्यक्‍तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्‍तींना योग्य सल्ला देण्यात आला नाही.

अनेकांची फसवणूक करण्यात आली. या सर्व बाबी चिंताजनक आहे. या काळात केंद्र सरकारकडे भ्रष्टाचाराच्या ४० हजार तक्रारी आलेल्या आहेत. वेबसाईटवर १ ‘लाख ६७ हजार तक्रारी करण्यात आल्या, परंतु त्यातील १ लाख ५० हजार तक्रारीकडे शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यावरून आपल्या देशातील नोकरशाहीची दिशा काय आहे, हे स्पष्ट होते. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याऐवजी त्यांच्यापुढे आणखी अडचणी निर्माण करणे हीच नोकरशाहीची भूमिका होती. नोकरशाहीची ही भूमिका अमानवी स्वरूपाची होती. सरकारने प्रशासकीय सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘प्रगती’ (प्रो ऑक्टिव गव्हर्नस अँड टाईमली इम्पलिमेंटेशन) हा नियम लागू केला होता. यामध्ये विविध मंत्रालयांचा समावेश होता. ‘प्रगती’च्या २५ नोव्हेंबरच्या बैठकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आला. आता पंतप्रधान याची माहिती घेऊ इच्छितात की, प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या किती तक्रारी आल्या आणि त्यावर कोणत्या व्यक्तीवर काय कारवाई करण्यात आली.