रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा

दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होतील, याची कल्पनाही कोणी केली नसेल.

    नियंत्रण आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, जुलै २०१९ ते २०२० पर्यंत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका खासगी कंपनीला फायबर केबल टाकण्यासाठी करोडो रुपये दिले होते. दरम्यान, काँग्रेस पक्षाने कॅगच्या अहवालाचा उल्लेख करून असा आरोप केला आहे की, या मंत्रालयालात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यामुळेच या मंत्रालयाला ‘भारत नेट’ कार्यक्रम जोमाने राबविणे शक्‍य झाले नाही.

    काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी असा प्रश्‍न उपस्थित केला आहे की, दूरसंचार विभागाने सीएससी- एसपीव्ही आणि दूरसंचारच्या मालकीची कंपनी पीएससी- वायफाय चौपाल सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील कंपन्यांना अप्रत्यक्षपणे कंत्राटे देण्यात आली होती. विशेष म्हणजे एक खासगी संस्था केवळ सरकारी कामेच करीत नव्हती तर ही संस्था ‘अशोकचक्र’ या सरकारी चिन्हाचाही वापर करीत होती, त्यामुळे लोकांना असे वाटत होते की, ही संस्था सरकारीच आहे.

    काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनीही असे म्हटले आहे की, कोणतीही खासगी कंपनी अशोकचक्राचा कसा काय वापर करू शकते आणि किती किती खासगी कंपन्या अशोकचक्राचा वापर करीत आहेत? दूरसंचार मंत्रालयात असलेल्या अशा प्रकारच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय व्हायला पाहिजे. खेडा यांनी असाही प्रश्‍न उपस्थित केला आहे की, भाजपा आणि सीएससी-एसपीव्ही यांच्यामध्ये काय संबंध आहेत?

    या कंपनीला देण्यात आलेले कंत्राट पूर्ण करण्यासाठी कोणतीही मुदत नसल्यामुळे सीएससीवर कोणताही दबाव नव्हता. या गडबडीच्या संदर्भात केवळ एका कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा घेणे तेवढे पुरेसे आहे का? करोडो रुपयांच्या या घोटाळाप्रकरणी काँग्रेसने सरकारवर जे आरोप केलेले आहेत, त्यावर सरकारकडून अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया मात्र व्यक्‍त करण्यात आलेली नाही.

    allegations against ravi shankar prasad scam of crores in information ministry