महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना आणि काँग्रेसपक्ष आता आमने- सामने आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मजबूत होऊ द्यायचे नाही, असा चंगच शिवसेनेने बांधला आहे.

    राज्यातील ठाकरे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच काम करीत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकारमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवून काँग्रेसला दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सशक्त आघाडी स्थापन करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वी शिवसेनेने दिला होता, तेव्हा काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवून असे म्हटले होते की, शिवसेना ‘युपीए’मध्ये नाही तेव्हा युपीएच्या नेतृत्वावर टिप्पणी करण्याचा अधिकार शिवसेनेला नाही.

    प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना डिवचण्याच्या उद्देशाने संजय राऊत यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या आपण केलेल्या सूचनांची दखल घेतात. शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखातून अशी विचारणा करण्यात आली होती की, काँग्रेस पक्ष आसाम आणि केरळमध्ये विद्यमान सरकारला पराभूत का करू शकला नाही ? शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमनांचा जणू वर्षावच केला.

    भविष्यात काँग्रेसला प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. सध्या तर एकटे राहुल गांधीच भाजपाविरुद्ध लढत आहेत. राहुल गांधी यांनी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारला धारेवर धरले आहे आणि काही सूचनाही केलेल्या आहेत. राहुल गांधींच्या अनेक सूचनांवर सरकारला निर्णयही घ्यावे लागले. राहुल गांधी हे सेनापती आहेत आणि सरकारवर ते जी टीका करताहेत ती अगदी मुद्दयांवर आधारितच असते. यावर नाना पटोले यांनी म्हटले आहे की, मी शिवसेनेचे मुखपत्र कधीच वाचत नाही.

    उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते जरी शिवसेनेचे मुखपत्र वाचत नसले तरी त्यांच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मात्र माझ्या लेखाची दखल घेतली होती. यावर नाना पटोले म्हणाले की, या लेखात काय लिहिले आहे हे वाचून नंतरच उत्तर दिल्या जाईल. शिवसेनेला कसे उत्तर द्यायचे हे आम्ही नंतर ठरवू. परंतु काँग्रेस मात्र कधीही कमजोर पडणार नाही.

    Allegations in the Mahavikas Aghadi Shiv Sena Congress face to face