मंत्र्याविरुद्ध जादूटोण्याचे षडयंत्र

राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्याविरूद्ध काळ्या जादूचा (Black Magic) वापर केल्याबद्दल पालघर पोलिसांनी (Palghar Police) काही लोकांना अटक केली आहे.

जादूटोणा आणि तंत्रमंत्र (Black Magic) असते किंवा नसते ही बाब महत्त्वाची नाही, परंतु अशा प्रकारामुळे लोकांच्या मनात शंका आणि भीती मात्र निर्माण होते. बंगाल आणि छत्तीसगडमध्ये ( Bengal and Chhattisgarh ) असे प्रकार खूप होत असतात. कितीतरी सुशिक्षित लोक त्यावर विश्‍वास ठेवतात. या सर्व अंधश्रद्धा आहे. या पाखंडाला विरोध करण्यासाठी अंधश्रद्धाविरोधी (Superstition) कायदाही आहे. या कायद्यांमध्ये तांत्रिक आणि मांत्रिकांना कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. देशामध्ये कित्येक ठिकाणी तांत्रिक-मांत्रिकांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. अनेक लोक यावर विश्‍वास ठेवून या तंत्रा-मंत्राचा वापर त्यांच्या विरोधकांविरुद्ध करीत असतात. हे मांत्रिक त्यांच्याजबळ जादूची शक्‍ती असल्याचा दावा करतात.

नोकरी, व्यवसाय व राजकारणात आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्यासाठी या तांत्रिक-मांत्रिकांची मदत घेतली जाते. या प्रकारांना अंधविश्वास जरी म्हणण्यात येत असले तरी असे प्रकार जनमाणसात रुजलेले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध काळ्या जादूचा वापर केल्याबद्दल पालघर पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे. पोलिसांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड ‘तहसीलमधील एका घरावर धाड टाकून या घरातून शिंदे यांचा ‘फोटो जप्त केला.

एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शेंदूर लावण्यात आला होता व फोटोसमोर लिंबू, मिरची ठेवण्यात आले होते. या ‘फोटोसमोर बळी देण्यासाठी एक कोंबडही बांधून ठेवण्यात आली होता. पोलिसांनी कोंबड्यासह सर्व सामग्री जप्त केली. दोन तांत्रिकांना अटक केल्यानंतर पोलीस आता मंत्रीमहोदयाचा जीव घेण्यासाठी कोण प्रयत्न करीत होते, त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रात जादू आणि अंधश्रद्धाविरुद्ध कायदा अस्तित्वात आहे. असे असतानाही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा गुन्हा आहे. असे प्रकार करून एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करणे हा गंभीर अपराध आहे. जादूटोणा आहे किंवा नाही हा भाग वेगळा, परंतु असे प्रकार करणे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकरणात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.