‘ब्लॅकमेलर’ची मंत्रिमंडळात वर्णी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावरून खळबळ

कर्नाटक मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला. लोकशाही आणि चारित्र्याच्या गप्पा मारणार्‍या भाजपाचा असली चेहरा या मंत्रिमंडळ विस्तारावरून उघड झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी ब्लॅकमेल करणाऱ्या व पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची वर्णी मंत्रिमंडळात लावली.

मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी तिसर्‍यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला आहे. या विस्तारित मंत्रिमंडळात जदसे-काँग्रेस सरकारमधून बंड करून भाजपामध्ये सहभागी झालेल्या आर. शंकर आणि एमबीटी नागराज यांना मंत्रिमंडळात सहभागी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना सीडीच्या माध्यमातून हे दोघेही ब्लॅकमेल करीत होते. येदियुरप्पा यांनी ब्लॅकमेलरलाच मंत्रिमंडळात स्थान दिले. राज्याचे वयोवृद्ध मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची ही पद्धत त्यांच्याच पक्षाच्या अनेक नेत्यांना मुळीच रूचली नाही. पक्षाच्या निष्ठावान नेत्यांना डावलून भ्रष्टाचार करणारे आणि लाचखोरांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी कोणता संदेश दिला आहे? भाजपाच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या या पद्धतीवर तीव्र टीका केलेली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर होन्नाळी मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम.पी. रेणुकाचार्य यांनी येदियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, हे सरकार आता केवळ २ जिल्ह्यापुरतेच सीमित झालेले आहेत. विजयपुरा शहराचे आमदार बी. पाटील यत्नाल यांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीर आरोप करताना म्हटले आहे की, ज्येष्ठ आणि प्रामाणिक नेत्यांना डावलून मुख्यमंत्र्यांनी आपले पितळ उघडे होऊ नये म्हणून ब्लॅकमेल करणा-यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले विधानपरिषद सदस्य ए.एच. विश्वनाथन यांनी आपल्याला दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याचा आरोप केला आहे. एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जदसे सरकारचा राजीनामा देऊन इ.स. २०१९  मध्ये भाजपामध्ये सहभागी झालेल्या १७ आमदारांपैकी एक असलेले विश्वनाथन यांनी म्हटले आहे की, आपल्या बलिदानामुळेच येदियुरप्पा मुख्यमंत्री बनले आहे, परंतु ते माझ्या बलिदानाची आठवण विसरले आहेत. भाजपा आमदार वसनगौडा यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना म्हटले आहे की, येदियुरप्पा यांनी आता राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे.