vijay rupani

खरं म्हणजे रुपाणी यांनी काँग्रेसवर इतक्या निम्न दर्जाची टीका करून भाजपाच्या खाल्ल्या मिठाची लाज राखलेली आहे. परंतु वस्तुस्थिती तर अशी आहे की, काँग्रेस आजही देशातील दोन मोठ्या राजकीय पक्षापैकी एक आहे.

देशातील महान नेत्यांचा सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसचे इतके अवमूल्यन झाले आहे की, गुजरातचे भाजपा मुख्यमंत्री विजय रुपाणी (Chief Minister Rupani) यांनी त्यांच्या राज्यातीळ काँग्रेस पक्ष केवळ २५ कोटी रुपयांत खरेदी करणे शक्‍य आहे, असे म्हटले आहे. हा केवळ गुजरातच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील काँग्रेसजणांचा अपमान आहे. गुजरातमधील अनेक काँग्रेस (Gujarat Congress ) जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले आहे. त्यांच्या महान त्यागाचा रुपाणी यांनी मोठा अपमान केलेला आहे. एका जाहीर सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करीत असताना रुपाणी म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता महात्मा गांधी यांचा आदर्शच राहिलेला नाही. गुजरातमधील काँग्रेस पक्ष तर २५ कोटी रुपयांत सहज खरेदी केल्या जाऊ शकतो. आजचा काँग्रेस पक्ष केवळ राहुल गांधीचा पक्ष झालेला आहे. काँग्रेस डुबते जहाज आहे. हा पक्ष घराणेशाही जोपासत आहे. काँग्रेसमध्ये राहून जनतेची कामे करणे कठीण आहे, असे आता काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. खरं म्हणजे रुपाणी यांनी काँग्रेसवर इतक्या निम्न दर्जाची टीका करून भाजपाच्या खाल्ल्या मिठाची लाज राखलेली आहे. परंतु वस्तुस्थिती तर अशी आहे की, काँग्रेस आजही देशातील दोन मोठ्या राजकीय पक्षापैकी एक आहे. भाजपा केवळ ४० वर्षे जुना पक्ष आहे तर काँग्रेस पक्षाला १३५ वर्षे झालेले आहेत. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्‍त करण्यासाठी काँग्रेस पक्षाने अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. या पक्षामध्ये केवळ कॅडरच नाही तर संपूर्ण देशातील जनता काँग्रेस बाजूने उभी राहिलेली आहे. जनमत काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळेच कठीण परिस्थितीचा सामना करीत काँग्रेसने गेलेली केंद्रातील सत्ता पुन्हा मिळविली होती. जनता पक्ष, जनता दल, संयुक्‍त आघाडी हे सर्व पक्ष काँग्रेस पक्षापुढे लोटांगण घालताना देशातील जनतेने पाहिलेले आहे. इंदिरा गांधींना देश आता नेहमीसाठी विसरून जाईल, असे इ.स. १९७७ मध्ये वाटत असतानाच १९८० मध्ये काँग्रेसने पुन्हा केंद्रीय सत्ता मिळविली होती. खरं म्हणजे भाजपाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की, १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना केवळ २ जागावरच विजय मिळाला होता. तथापि वेळ काही नेहमी सारखी राहत नाही, आज भाजपा केंद्रात सत्तेत आहे, परंतु भाजपाची ही चमक-धमक केवळ नरेंद्र मोदीमुळे आहे. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अजूनही काँग्रेसची सरकारे आहेत. एनडीएचे मित्रपक्ष शिवसेना, अकाली दल आणि लोजपाने भाजपाची साथ सोडलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मोठी किंमत मोजून खरेदी करण्याचे वक्तव्य करणे हे ‘लोकशाहीविरोधी आहे. कर्नाटक आणि गोवा येथे भाजपाने हेच केले होते. याच भाजपाच्या काही नेत्यांनी यापूर्वी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा केली होती. लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष अत्यावश्यक असतो. भाजपाला एकपक्षीय सत्ता म्हणजे हुकूमशाही हवी आहे का?