मोदींविरुद्ध चीनचे कारस्थान, विजयवर्गीय यांचे अजब विधान

देशातील समस्या सोडविण्यास जेव्हा नेत्यांमध्ये कुवत नसते तेव्हा ते त्यांचे अपयश लपविण्यासाठी विरोधी शक्‍तीचा हात असल्याचा नेहमी आरोप करीत असतात.

    राजकीय नेत्यांचा हा फार जुना फार्म्युला आहे. जनतेच्या डोळ्यांत ते नेहमीच धूळफेक करीत असतात. लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आणखी तीन वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. पुढील लोकसभेच्या निवडणुका भाजपा जिंकू शकेल की नाही याची मोदी-शाह या जोडीला धास्ती आहे. त्या निवडणुकीत आपला पराभव तर होणार नाही ना, अशी भीती या जोडीला आहे.

    बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत सर्व शक्‍ती पणाला लावल्यानंतरही भाजपचा पराभव झाल्यामुळे भाजप नेत्यांचे मनोबल खचले आहे. यानंतरही देशातील वाढती महागाई, बेकारी, पेट्रोल आणि डिझेलच्या आकाशाला भिडणाऱ्या किमती, कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आलेले अपयश, कोरोना प्रतिबंधक लसी आणि ऑक्सिजनची कमतरता, देशातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि उत्तरप्रदेश सरकारचे गैरव्यवस्थापन इत्यादींनी भाजपचे पितळ उघडे पडले आहे.

    आता या अपयशाचे खापर कोणावर फोडायचे हे लक्षात घेऊन भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी नवीच खेळी केली आहे. इ.स. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नये यासाठी चीन काहीतरी षडयंत्र करू शकते, अशी शक्‍यता विजयवर्गीय यांनी व्यक्‍त केली. चीनने यापूर्वी कोरोना व्हायरस पसरवला आता चीनची नजर पंतप्रधान मोदींचे सरकार पाडण्यावर आहे. चीनच्या कारवायांमुळेच अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आता चीनचे लक्ष भारतावर आहे.

    विजयवर्गीय काहीही बोलत असले तरी आता भारतातील कम्युनिस्ट पक्ष कमजोर झालेले आहेत. चीनने ज्याप्रकारे नेपाळमध्ये हस्तक्षेप केला तसे भारतात करणे चीनला कदापिही शक्य होणार नाही. भारतात कोणीही चीनच्या हातातील खेळणे नाही. आपले अपयश दूर करण्याऐवजी चीन मोदींच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कटकारस्थान रचत असल्याच्या अफवा भाजप पसरवित आहे. विजयवगींय यांच्या या मताशी कोणीही सहमत होणार नाही.

    Chinas conspiracy against Modi Vijayvargiyas strange statement