नामांतरावरून आघाडीमध्ये मतभेद

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेने आपल्या हिंदुत्वाच्या धोरणानुसार औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याचे सूतोवाच केले आहे. हिंदूंकडून झिजिया कर वसूल करणाऱ्या आणि मंदिराची तोडफोड करणाऱ्या औरंगजेबाच्या अत्याचाराविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी प्रचंड संघर्ष केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

या पितापुत्राने औरंगजेबाविरुद्ध लढा दिला नसता तर संपूर्ण दक्षिण भारताचे इस्लामीकरण झाले असते. औरंगजेब हे नाव मुस्लीम दास्यत्वाचे स्मरण करून देत असते म्हणून औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची आवश्यकता सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस आणि राकाँ या पक्षांनी मात्र शिवसेनेच्या नामांतराच्या मोहिमेला तीव्र विरोध केलेला आहे. नामांतराचा मुद्दा पुढे करून शिवसेना जनतेच्या भावनेशी खेळत आहे, असे या पक्षांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तर असे स्पष्ट मत आहे की, शहराच्या नामांतरणाला राजकीय मुद्दा बनविणे अयोग्य आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी म्हटले होते की, या मुद्दयावर सरकारमध्ये सहभागी सर्व पक्ष एकमताने निर्णय घेतील. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खूप तणाव आहे, अशा कितीही बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी महाविकास आघाडी सरकारचे कोणी काहीही बिघडवू शकणार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे आणि ते राहणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या याची जाणीव करून दिली होती की, औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हते आणि ते हिंदूवर अत्याचार करीत होते. यावर थोरात यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारची स्थापना होतेवेळीच जनतेच्या कल्याणासाठी समान किमान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. वास्तविकतेच्या आधारावर राजकारण केले जाते, भावनेच्या आधारावर नाही. भाजपा आणि शिवसेनेवर प्रहार करताना थोरात म्हणाले की, जेव्हा मागील वेळी शिवसेना आणि भाजपाने मिळून युती सरकार स्थापन केले होते, तेव्हा त्यांना नामांतरणाचा मुद्दा का आठवला नाही. आता हेच बघायचे आहे की, काँग्रेस आणि राकाँच्या दबावामध्ये शिवसेना नामांतरणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवणार आहे की, जनभावना लक्षात घेऊन हा प्रश्‍न दृढतेने पुढे घेऊन जाणार आहे. हा मुद्दा असा आहे की, त्याचे समर्थन आणि विरोधही केला जाऊ शकतो.