ना खाऊँगा, ना खाने दूँगाच्या घोषणा हवेतच! कुंपणच जेव्हा शेत खाते, २१९ कोटी रूपयांचा भविष्य निधी घोटाळा

भ्रष्टाचारी इतके लोभी असतात की, गरीब, मजुरांची मेहनतीची कमाई हडप करण्यासाठी ते मागे-पुढे पहात नाही. नोकरदारवर्ग भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांच्या वेतनाची काही रक्कम जमा करतात. सेवानिवृतीनंतर ही रक्‍कम व्याजासहित आपल्याला परत मिळेल, यामुळे आपल्याला मोठा आधार मिळेल, अशी प्रत्येक कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते.

    सेवानिवृतीनंतर ही रक्‍कम आपल्याला हमखास मिळणारच आहे, अशी खात्री कर्मचाऱ्यांना असते. मुला-मुलींचे लग्न, घराच्या बांधकामासाठी किंवा कोणतीही तातडीची गरज पडल्यास पीएफ मधून अँडव्हान्स रक्कम काढता येते. खूपच गरज पडली तरच भविष्य निर्वाह निधीतून कर्मचारी पैसे काढतात अन्यथा आपल्या वृद्धापकाळापर्यंत या रकमेला ते हातही लावत नाही.

    भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची ही रक्‍कम अनामत म्हणून जमा असते. परंतु काही भ्रष्टाचारी प्रवृतीच्या लोकांची नजर कर्मचाऱ्यांच्या या रकमेवर असते. मुंबईच्या कांदिवली येथील पीएफ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून २१ कोटी रूपयांचा घोटाळा केला.

    चंदनकुमार सिन्हा नावाच्या कारकुनाने प्रवासी मजुरांच्या ८१७ बँक अकाऊंटमधून २१.५ कोटी रूपये स्वतःच्या खात्यात जमा केले. कोरोना काळात या प्रवासी मजुरांचे अत्यंत बेहाल झाले. काही जणांचा मृत्यूही झाला. या मजुरांनी त्यांच्या पी.एफ. खात्यात जमा केलेल्या रकमेवर चंदनकुमारने हात साफ केला. हा प्रकार अत्यंत अमानवीय आहे.

    याप्रकरणी चंदनकुमार सिन्हा आणि इतर ४ आरोपींना निलंबित करण्यात आले आहे. सध्या खात्यांतर्गत चौकशी सुरू असून या चौकशीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येणार आहे. घोटाळेबाज आजच जन्माला आलेत असाही भाग नाहीच. केंद्रात म्हणा की, राज्यात सरकार कुणाचेही आले तरी घोटाळ्यांना ब्रेक मिळेल असा भागच नाही. ते करणारे बेधडक असतात.

    आपल्या घोटाळ्यात ते काहींना सहभागी करतात. गरीब, श्रीमंत कुणाचाही विचार न करता ते आपले खिसे आधिकाधिक गरम कसे राहतील याचीच काळजी अधिक घेतात. परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिक तयारी असते. घोटाळ्यातील काही रक्‍कम प्रकरण निस्तारण्यासाठी ते वापरतात. काहीच शक्‍य झाले नाही तर तुरुंगात जाण्याची त्यांची मानसिक तयारी असतेच.